जिल्हयात उद्भवलेल्या कोविडच्या भयंकर परिस्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार

खा.डॉ.हीना गावित यांचा गंभीर आरोप
जिल्हयात उद्भवलेल्या कोविडच्या भयंकर परिस्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शनची नितांत आवश्यकता आहे.

सुमारे अडीच हजार रेमडीसिविर इंजेक्शन उपलब्ध असतांना जिल्हाधिकारी सदर इंजेक्शन कोविड रुग्णालयांना पुरवत नसल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात उद्भवलेल्या कोविडच्या या भयंकर परिस्थितीला जिल्हाधिकारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत केला.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत व मृत्यदरात वाढ होत असतांना यावर नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी खा.डॉ.हीना गावित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

खा.डॉ.गावित म्हणाल्या, दि.१० एप्रिल रोजी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीत पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांना सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

त्यास तीन दिवस उलटल्यानंतर देखील जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. जिल्ह्यात कोविडबाबत कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोविड-१९ रुग्णांना उपचार पूर्ण होईपर्यंत नियमित इंजेक्शनचा दिला जाणारा डोस मिळणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात रेमडेसिविर उपलब्ध असतांना ते देण्याचे आदेश का देत नाहीत? असा सवाल खा.डॉ.हीना गावित यांनी उपस्थित केला.

खरे तर आयसीएमआरच्या सुचनेनुसार लक्षणे कमी करण्यासाठी तसेच त्रास कमी होण्यासाठी सिटीस्कॅनचा स्कोर ८ पेक्षा कमी असलेल्या रुग्णांना देखील देण्याचे म्हटले असल्याचे खा.डॉ.गावित म्हणाल्या. असे असतांना जिल्ह्यात रेमडेसिवीरचा तुटवडा प्रशासकीय यंत्रणाच निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही रेमडीसिविर देण्यात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनात ताळमेळ नाही. जिल्हा प्रशासन कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले आहे. जिल्हा रुग्णालयाकडून दिले जाणारे आकडे व वास्तव यामध्ये तफावत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना येण्यास मनाई असल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडायचे कोणाकडे? असा सवाल डॉ.मोरे यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप देखील डॉ.मोरे यांनी केला.

कार्यपद्धतीत बदल झाला नाही तर याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारकडे देखील तक्रार करणार असल्याचे खा.डॉ.गावित, डॉ.मोरे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com