मुंबई क्राईम ब्रँचचे पथक चौकशीसाठी शहाद्यात

शहादा येथील दोघांकडून मुंंबई येथे चार पिस्टल व 10 काडतुसांची विक्री
क्राईम
क्राईम

शहादा - Shahada - ता.प्र :

मुंबई येथे अवैध अग्निशस्त्र व दारुगोळा विक्रीसाठी आलेल्या शहादा येथील दोघांना चार लाख रुपये किमतीचे 4 पिस्टल, 10 काडतूसासह अटक करण्यात आली आहे.

तसेच 2 लाखाचे वाहन असा एकुण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 37(1) (अ) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8 जानेवारी रोजी मुंबईत घडलेल्या या घटनेच्या तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस पथक शहादा येथे आले आहेत. त्यांनी दोन्ही संशयित आरोपींच्या घराची झडती घेतली असून शहादा पोलीसांच्या मदतीने अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

याबाबत मुंबई पोलीस क्राईम बँ्रचने दिलेल्या माहितीनुसार, दि.8 जानेवारी 2021 रोजी कांदिवली पश्चिम मुंबई कक्षा प्रभारी पोलीस निरीक्षक सुनिल माजे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम हे त्यांच्याकडील अग्निशस्त्र व दारुगोळा विक्री करण्यासाठी पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून जयवंत सावंत रोड, बोरिवली मुंबई याठिकाणी येणार आहेत.

त्याबाबत वरिष्ठांना माहीती देवून तात्काळ प्रपोनि सुनिल माने यांच्या नेतृत्वाखाली कक्ष 11च्या पथकाने सदर ठिकाणी पाळत ठेवली. मिळालेल्या बातमीनुसार त्याठिकाणी संशयीत पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आली असता पथकाने कारला थांबविले.

कारमध्ये बसलेले दोन इसम हे संशयास्पद वर्तन व हालचाली करू लागल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेवून पंचांच्या मदतीने त्यांची व कारची झडती घेतली. दोन्ही इसमांकडे एकूण चार देशी बनावटीचे पिस्टल व दहा जिवंत काडतुसे मिळाली.

त्यांच्याकडे हत्यार बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यांनी बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे व दारुगोळा विनापरवाना कब्जात बाळगल्याने त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे मिळून आलेले अग्निशस्त्र, दारुगोळा व मोटारवाहन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी इम्रान पिंजारी व जुबेर खान हे शहादा येथील रहिवासी असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना किल्ला कोर्ट 37 नंबर आझाद मैदान व्हीटी येथील न्यायालयात हजर केले असता 14 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सदर कामगिरी पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त एस.विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक, सुनिल माने, पो.नि. रईस शेख, स.पो.नि. शरद झिने, स.पो.नि. नितीन ओकर, स.पो.नि. विशाल पाटील, पो.उ.नि. तानाजी पाटील, कोरगावकर व अंमलदार रविंद्र भांबीड, राजू गारे, संतोष तेली, संतोष माने, दिलीप वाघरे, सुबोध सावंत, राकेश लोटणकर, सविन कदम, जयेश केणी, अजय कदम, महेश रावराणे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, 8 जानेवारी रोजी मुंबईत घडलेल्या या घटनेच्या तपासासाठी मुंबई येथील क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक आर.एम.शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक निदीन उदेकर इतर पाच जणांचे पोलीस पथक अर्टीगा कार (क्र.एमएच 47 एएन 8750) ने शहादा येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शहादा येथील दोन्ही संशयित आरोपींच्या घरांची झडती घेतली असून त्यांची माहिती जाणून घेतली आहे. शहादा पोलीसांचे गुन्हे शोध पथकाचेही त्यांना सहकार्य लाभले. संशयितांनी कोणाला पिस्तुल विकले आहे, याची माहिती घेतली. शहादा येथे अशाप्रकारे घातक शस्त्रे विकली जात असूनही शहादा पोलीस अनभिज्ञ आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com