मोदलपाडा ता. तळोदा - Modalpada - वार्ताहर :

तळोदा तालुक्यातील चिनोदा, प्रतापपूर व तुळाजा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे काम संबंधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे अवघ्या काही दिवसातच या रस्त्यावर अक्षरशः मोठं मोठे खड्डे पडले आहे.

शासनाच्या नियमानुसार सदर रस्त्याची देखभाल व दुरुस्ती ठेकेदाराला पाच वर्षापर्यंत करावयाची असते मात्र संबंधित ठेकेदाराने शासनाच्या आदेशाला पूर्णतः केराची टोपली दाखवून दुरुस्तीकडे पाठ फिरवल्याने गेल्या दोन वर्षांपासून या ग्रामीण भागातील जनतेला खड्यांचा सामना करावा लागत आहे.

सदर निकृष्ट दर्जाचे रस्ते कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी व शासनाचा वाया गेलेला खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी प्रतापपूर, रांझनी, चिनोदा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, चिनोदा, रांझनी, सिलिंगपूरमार्गे तुळाजा रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आले होते.

सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली होती. वास्तविक मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तयार होणार्या रस्त्याची पाच वर्षांच्या कालावधी पर्यंत देखभाल व दुरुस्ती ची जबाबदारी ही काम करणार्या संबंधधित ठेकेदाराची असते.

असे असतांना देखील दोन वर्षांपासून या मार्गावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन धारकांना वाहन चालविणे अत्यंत कठीण झाले आहे.

यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी वाहन धारकांकडून वारंवार मागणी करूनही संबंधित ठेकेदाराने शासनाचा आदेशाला केराची टोपली दाखवत प्रतापपूर, रांझनी परिसरातील जनतेकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तुळाजा, प्रतापपूर, चिनोदा हा रस्ता तळोदा तालुक्यातील सिलिंगपूर, राणीपुर, धनपूर, जीवननगर, गोपाळपूर, खर्डी, बंधारा अश्या तब्बल 25 ते 30 खेड्यांना जोडला जातो.

त्यामुळे या खड्डेयुक्त रस्त्याच्या रोजच परिसरातील जनतेला सामना करावा लागत आहे. व त्यातच यामध्ये ग्रामीण भागातून तालुक्यात येणारे प्रवासी असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.

तरी देखील संबंधिताकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने जनसामान्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर प्रतापपूर, रांझनी, या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरण्याचा तयारीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.