तळोदा येथे भरदिवसा वृद्धेच्या गळयातील मंगळसुत्र लांबविले

चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
तळोदा येथे भरदिवसा वृद्धेच्या गळयातील मंगळसुत्र लांबविले

मोदलपाडा/सोमावल ता.तळोदा वार्ताहर TALODA

बाजारात आंबे घेण्यासाठी आलेल्या तळोदा शहरातील ७० वर्षीय वृद्ध महिलेला दोन भामटयांनी मोफत ५ किलो तांदूळ मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र व मणीवर हात साफ केल्याची घटना भरदिवसा व भरबाजारपेठेत घडली. या घटनेमुळे महिलांमध्ये भिती पसरली आहे. यातील एक भामटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, तळोदा शहरातील खान्देशी गल्लीच्या रहिवाशी असलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिला इंदूबाई सुदाम सूर्यवंशी ह्या सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आंबे घेण्यासाठी बाजारपेठेत आल्या होत्या.

पाठीमागून दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवून आजी ५ किलो मोफत तांदळाचे वाटप सुरू आहे. आम्ही तुला ५ किलो मोफत तांदूळ मिळवून देतो असे सांगत त्यांना मेनरोड विठ्ठल मंदिर सोमोरील गल्लीत घेवून गेलेत.

त्यानंतर त्यांनी त्या वृद्ध महिलेला सांगितले, आजी तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पाहून तुम्ही गरीब दिसणार नाहीत म्हणून तुम्हाला मोफत तांदूळ दिले जाणार नाहीत, असे सांगत त्यांनी आजीला गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवण्यास सांगितली व हातचलाखी करत सोन्याची पोत दोन्ही भामट्यानी चोरली.

त्या वृद्ध महिलेला आपली पोत चोरी गेली हे समजेपर्यंत दोन्ही भामट्यांनी तेथून पळ काढला.

याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहचलेत. पो. कॉ. अजय कोळी व युवराज चव्हाण हे बाजारपेठेतील ज्वेलर्स व इतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम उशिरापर्यंत करीत होते.

त्यात एक भामटा या वृद्ध महिलेला बाजारातून कोपर्‍याच्या गल्लीत घेवून जातांना दिसत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तळोदा शहरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अगोदरच नागरिक हे कोरोना या महामारीमुळे अक्षरशः हतबल झाले आहेत. त्यामध्ये आता अजून या चोरीच्या घटनेमुळे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल.

चोरट्याना पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. तळोदा शहरात महिला असुरक्षित आहेत की काय? अश्या प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. तळोदा पोलीस कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून महिलांची सुरक्षा लक्षात घेता पोलिसांनी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com