खापरला लस नसल्याने मनस्ताप

खापरला लस नसल्याने मनस्ताप

नागरिकांना गाठावे लागतेय अक्कलकुवा रुग्णालय

खापर - Khapar - वार्ताहर :

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे नागरिकांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अक्कलकुवा तालुक्यात एकीकडे लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे, गाव-पाड्यांवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे, तर दुसरीकड़े खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी गावकर्‍यांना वारंवार फेर्‍या माराव्या लागत आहेत.

खापर हे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गांव आहे. येथे लसीचा साठाही पुरेसा असावा, परंतु 45 ते पुढील वयोगटातील लसीकरण झाल्यावर उर्वरित लसी 18 ते 44 वयोगटात देण्यात येतात.देण्यात येणार्‍या लसीकरणात शिफारशींच्या आधारावर लस देण्यात येत असल्याची तक्रार गावकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

लसीकरणाबद्दल येथील कर्मचारी सकारात्मक नसून येणार्‍या गांवकर्‍याशी अरे-रावीची भाषा करत, उड़वा-उड़वीची उत्तरे देतात, आरोग्य केंद्राच्या अशा सेवेमुळे गावकर्‍यांना दुसर्‍या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे भाग पडत आहे.

लसीचा साठा उपलब्ध नसल्याचे कारण नेहमीच येथील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येते, तर लस उपलब्ध करुन देण्याचे काम कुणाचे असा प्रश्न निर्माण होतो. तसेच येथील रुग्नवाहिकेवर कायमस्वरूपी चालक नसल्याचे समोर येते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना खाजगी वाहनाची मदत घ्यावी लागते.

याबाबत दखल घेत संबंधित अधिकार्‍यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रावर 18 ते 44 व 44 ते त्यापुढील वयोगटातील लसीकरण सरसकट सुरू करावे व लसींच्या पुरेसा साठा खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com