खेतिया - Khetiya - वार्ताहर :

लोककल्याणासाठी भगत महाराजांनी मॉ नर्मदा परिक्रमा यात्रा ही दंडवत साष्टांग प्रणाम करून करण्याचा संकल्प केला आणि दि.1 जानेवारी 2020 पासून बालकदास आश्रम साजिया घाट जिल्हा होशंगाबाद येथून परिक्रमेस सुरूवात केली.

आज ते 600 किलोमीटर दंडवत प्रणाम घालून खेतिया येथे नर्मदा परिक्रमा करीत पोहोचले.

माँ नर्मदा परिक्रमा ही एकूण 3600 किलोमीटर असून ही यात्रा एकूण नऊ वर्षात भगत महाराज पूर्ण करणार आहेत. महाराज हे दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करीत असतात. भगत महाराज यांचे गुरू महाराज बापोली महाराज यांनी प्रेरणा दिली आणि दोन वेळा ते गाडीने व तीन वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. एकूण पाच वेळा आतापर्यंत भगत महाराज यांनी परिक्रमा केली असून ही आता दंडवत प्रणाम करून सहाव्यांदा नर्मदा परिक्रमा करीत आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत महाराज हे दंडवत प्रणाम परिक्रमा करीत आहेत.

यावेळी त्यांनी सांगितले की ही सर्व नर्मदामैय्याची कृपा असून नर्मदामाता ही मला ऊर्जा व बळ देत असते. माझ्याजवळ ओढण्याचे, पांघरण्याचे, पिण्याच्या पाण्याचा एक डबा असून ठिकाणी भाविकांतर्फे सोय करून देण्यात येत असते आणि माँ नर्मदा नदी ही पावन नदी आहे. तिची परिक्रमा करीत असताना नर्मदा परिक्रमावासियांना अडचणीच्या वेळेस कोणत्याही रूपात येऊन माँ नर्मदा मदत करीत असते, तसेच मार्ग दाखवीत असते. नर्मदे हर चा जयघोष करत ही दंडवत प्रणाम परिक्रमा भगत महाराज करीत आहेत. सध्या आता भगत महाराज यांच्यासोबत राजपूर येथून दोन परिक्रमावासी महाराज सोबत चालत आहेत.