लाच  मागणार्‍या शहादा येथील कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवकाला अटक
नंदुरबार

लाच मागणार्‍या शहादा येथील कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवकाला अटक

बिलाचे पेमेंट काढून देण्यासाठी मागितली लाच

Rakesh kalal

नंदुरबार । प्रतिनिधी- NANDURBAR

केलेल्या कामाच्या बिलाचा धनादेश काढून 24 हजाराची लाच मागणार्‍या शहादा पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता व टेंभली येथील ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मूळ तक्रारदाराने सन 2018-19 या कालावधीत शहादा तालुक्यातील टेंभली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत होळ गुजरी ग्रामपंचायतीचे वस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे काम जनसुविधा 2515 योजनेअंतर्गत केले होते.

या कामाची 9 लाख 99 हजार रुपयांची निविदा टेभली या ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली होत.ीसदर काम नमूद एजन्सीने तक्रारदारांना सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिले होते व तसा करारनामा करण्यात आला होता.

हे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाल्याने टेभली ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने 8 लाख 5 हजार 200 रुपयांचा धनादेश मार्च महिन्यात वर्ग केला.

परंतु रक्कम न मिळाल्याने तक्रारदारांनी शहादा येथील पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता राजेश लक्ष्मण पाटील (वय 41), ग्रामसेवक प्रविणसिंग कोमलसिंग गिरासे (वय 40) यांना विचारले असता राजेश पाटील याने नमूद कामाचा धनादेश काढून देण्यासाठी 24 हजार रुपये लाचेची मागणी केली.

ग्रामसेवक प्रविणसिंग गिरासे याने त्यांना प्रोत्साहन दिले.दोघा लोकसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अप्रामाणिकपणे भ्रष्ट बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून लाचेची मागणी दि.8 जून 2020 रोजी पंचायत समिती कार्यालय शहादा येथे पंचासमक्ष केली.

म्हणून आज रोजी तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहेसदर कारवाई पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली. कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com