नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

स्प्राऊटींग सीड आंतरराष्ट्रीय लघूच़ित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या निवडक लघूचित्रपटाला रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.महोत्सवाचे उदघाटन आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयांवर भाष्य करणार्या चित्रपटांमुळे रसिकांना मेजवानी मिळाली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात आयोजित खानदेशात प्रथमच आयोजित आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात भारतात राहणार्या ज्यूरींनी हजेरी लावली. उदघाटन कार्यक्रमाला परीक्षक डॉ.आलोक सोनी, मुंबई येथील दिग्दर्शक श्याम रंजनकर, सुभाष तायडे पाटील, शुूभम अपूर्वा, आयोजन समितीचे संचालक डॉ.सुजित पाटील, डॉ.प्रकाश ठाकरे, डॉ.सी.डी.महाजन, डॉ.राजेश कोळी, खुशालसिंग राजपूत, रणजित राजपूत, रोशनी फिल्म फेस्टीवलचे संस्थापक संचालक तुषार थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

उदघाटक राजेंद्रकुमार गावित म्हणाले कि,नंदुरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्हयात आंतरराष्ट्रीय स्तरावर लघ्ूचित्रपट महोत्सव भरविण्यात आले आणि त्याचे उदघाटन माझ्या हस्ते झाले,याबाबत माझे मन भारावून गेले आहे. नंदुरबार जिल्हयाला साहित्य, सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवामुळे नंदुरबारचे नाव जगातील 35 देशामध्ये पोहचले.यामुळे आयोजकांना धन्यवाद देतो.

परिक्षक आलोक सोनी म्हणाले, अनेक भागात आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सव भरविण्यात येतात.परंतू नंदुरबार या छोटयाशा शहरात उत्तम आंतराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सव भरवून मोठया शहरातील महोत्सवाला लाजवेल असा सोहळा साजरा केला. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक भागात चित्रपटाची चळवळ रूजू शकेल. हा महोत्सव अनेकांना दिपस्तंभ ठरेल,यात शंका नाही.

बंगाली,मराठी,हिंदी ,इंग्रजी,मल्याळम तसेच अशा विविध भाषिक निवडक लघूचित्रपट दाखवण्यात आले. या महोत्सवासाठी त्रिपूराहून दिग्दर्शकांनी हजेरी लावली.तसेच महाराष्ट्रातील औरंगाबादसह विविध शहरातून दिग्दर्शक, कलावंतांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन पाहून दिग्दर्शकांनी कौतूक केले.

लघूचित्रपटाचा आनंद घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक,रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली. ज्येष्ठ साहित्यिक पितांबर सरोदे, मौखिक आदिवासी संमेलनाचे अध्यक्ष भिमसिंग वळवी, रायसिंग वळवी, ,जिभाऊ करंडकचे आयोजक नागसेन पेंढारकर, कलावंत विजय पवार, सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे, तुषार ठाकरे आदींंसह अनेक मान्यवरांनी लघू चित्रपट महोत्सवाचा लाभ घेतला.मॉन्टेनिग्रो या देशातून आलेली अॅलेक्झांडर वू जो विक दिग्दर्शित रेनबो हा लघू सिनेमा दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.सुजित पाटील,रणजित राजपूत यांनी केले.

माय ब्लडी जीन्स, पर्ण, रेनबो, द प्रुप, अलबम, अॅना, मानूश, इनर, लाहीलाही, मद, पलक, तारीक, उमाआश्चे, कोंदण,बदलते सितारे, मधली सुटी, को वॉर, देव, दुर्गा, फेस बीहाइँड दि स्माईल, ग्रे,इंटू हर शूज आदी निवडक लघूपट दाखविण्यात आले.