जिल्हयातील रुग्णांना इंजेक्शन मिळत नसेल तर जाब विचारणारच

रेमडिसिवीर इंजेक्शनबाबत माजी आ.रघुवंशींकडून राजकारण : खा.डॉ.गावित
जिल्हयातील रुग्णांना इंजेक्शन मिळत नसेल तर जाब विचारणारच

नंदुरबार| प्रतिनिधी - NANDURBAR

रेमडीसीवर इंजेक्शनबाबत माजी आ.रघुवंशी हे राजकारण करत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरसह कुठेही इंजेक्शन विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आलेले इंजेक्शन सरळ रूग्णालयांना मिळणार आहे.

त्यामुळे रोटरी वेलनेस सेंटरला मिळणारे इंजेक्शन बंद झाले म्हणजे जिल्ह्यात येणारे इंजेक्शन बंद झाले असे नाही. जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार होत नसेल, इंजेक्शन मिळत नसेल तर मी जाब विचारणारच असे प्रत्युत्तर खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिले.

नंदुरबार येथील रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजूंना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र खा.डॉ.हिना गावीत यांच्या तक्रारीमुळे रेमडीसीवरचे वाटप बंद करण्यात आल्याचा आरोप माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता.

या आरोपाचे खंडन करण्यासाठी खा.डॉ.हिना गावीत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खा.डॉ.गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांमुळे मिळू शकत नाही. म्हणून मी दोन पत्रकार परिषद घेवून जाब विचारला होता. त्यानंतर प्रशासन कामाला लागले. खाजगी दवाखान्यांना ५०० रेमडीसीवर इंजेक्शन वाटप करण्यात आले. रेमडीसीवर इंजेक्शनबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले.

शासनाने आदेश दिला आहे की, रेमडीसीवर इंजेक्शन इतर ठिकाणी वाटप न होता रूग्णालयांना देण्यात यावे. इंजेक्शनबाबत माजी आ.रघुवंशी राजकारण करत आहेत. स्वतःच्या नावाचा उदोउदो करण्यासाठी त्यांनी रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून दुकान थाटले होते. जिल्ह्याला इंजेक्शन मिळावे, यासाठी मी विविध कंपन्यांच्या संपर्कात होती. त्यातून १५०० इंजेक्शन रूग्णालयांना उपलब्ध करून दिले. या इंजेक्शनबाबत शासनाने कोटा ठरविला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यासाठी १.२७ टक्के इतका आहे.

असे असतांना जिल्हाधिकार्‍यांनी रेमडीसीवर इंजेक्शनचा कोटा रोटरी वेलनेस सेंटरला वळविला. जिल्हाधिकारी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी का करत नाही, याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना जाब विचारला. नंदुरबार येथील रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून रेमडीसीवर इंजेक्शन वाटप होत होते. मात्र हे इंजेक्शन गरजूंना न मिळता चेहरे पाहून वाटप होत होते. रूग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी ८ ते १० तास रांगेमध्ये उभे रहावे लागत होते.

माजी आ.रघुवंशी यांना प्रामाणिक मदत करायची होती तर रोटरी वेलनेस सेंटरच्या दुकानातून वाटप न करता सरळ रूग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करून देता आले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही. मीदेखील १५०० इंजेक्शन उपलब्ध करून विविध रूग्णालयांना वाटप केले. नंदुरबार येथील रोटरी वेलनेस सेंटरला मिळणारे इंजेक्शन शासनाच्या आदेशानुसारच बंद झाले आहे. रोटरी वेलनेस सेंटरला मिळणारे इंजेक्शन बंद झाले याचा अर्थ जिल्ह्यात येणारे इंजेक्शन बंद झाले असे होत नाही.

जिल्ह्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे इंजेक्शन उपलब्ध होतील. जिल्ह्यातील रूग्णांवर वेळेवर उपचार होत नसेल, इंजेक्शन मिळत नसेल तर मी जाब विचारणारच, असेही खा.गावितांनी सांगितले. केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी दिलेले मोफत इंजेक्शन श्री.रघुवंशी यांनी विक्री केले. त्यांनी सहा हजार इंजेक्शन वाटले तर उसनवारी मिळालेले एक हजार इंजेक्शन परत का केले नाही, असेही खा.गावितांनी सांगितले.

यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना वाढीला, मृत्यूला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, फुड इन्स्पेक्टर आहेत. यातून गैरप्रकार करायचा होता म्हणूनच असा प्रकार केला. जिल्ह्याचा कोटा परस्पर रूग्णालयांना न देता वेलनेस सेंटरला का दिला, असाही प्रश्‍न उपस्थित केला. याबाबत अनियमीतता केली असेल त्या सर्वांची चौकशी होवून कारवाई होणार आहे, असे आ.डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com