नंदुरबार जिल्हयात दमदार पाऊस, नदीनाल्यांना पूर

नंदुरबार जिल्हयात दमदार पाऊस, नदीनाल्यांना पूर

नंदुरबार/शहादा । प्रतिनिधी -

नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने पुनरागमन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हयातील नदीनाल्यांना पूर आले आहे. शहादा येथील गोमाई नदीला मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवडयापासून जिल्हयात वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. पिके तर गेली परंतू आता पिण्यासाठी पाणी मिळेल की नाही अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. परंतू गेल्या दोन दिवसांपासून जिल्हयात सर्वत्र पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे जिल्हा जलमय झाला आहे. जिल्हयातील अनेक नदीनाल्यांना पूर आला असून वातावरणात गारवा पसरला आहे.

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जळगाव जिल्हयातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मध्यरात्री 1 वाजता हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 23 हजार 944 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 2 दरवाजे पूर्णपणे उघडून 43 हजार 24 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे पूर्णपणे उघडून 57 हजार 666 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा येवा लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

शहादा

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी रात्री मुसळधार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदित झाले. पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा प्रथमच गोमाई नदीला मोठा पूर आला. काही ठिकाणी ऊस आडवा झाला. तालुक्यात एकूण 521 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

तालुक्यात यंदा खरीपाचे उत्पादन वाया गेल्यातच जमा आहे. रब्बी हंगामाची मदार पुढील पावसावर अवलंबून आहे. यंदा शेतकर्‍यांना आधीच दुबार पेरणीचे संकट होते. शेतकरी हवालदिल झाला होता. मोठी झालेली पिके वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी करीत होते. पिकांना कोळपणीच्या आधार दिला जात होता. तालुक्यातील सिंचन प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर होते. जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. पाणी टंचाईचे संकट समोर उभे होते मात्र (ता.31) ला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह सारेच सुखावले.

रात्री आठ वाजेपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. शहरातील रस्त्यांवर पाणी वाहू लागले. ग्रामीण भागात व सातपुडा पर्वत रांगेत जोरदार पाऊस झाल्याने गोमाई, सुसरी, कन्हेरी, वाकी नद्यांना पूर आलेत. गोमाई नदीला मोठा पूर आल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या पावसामुळे जमिनीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल एकंदरीत समाधानकारक पाऊस झाला असला तरी अद्याप संततधार पाऊस होणे गरजेचे आहे.

मंडळ निहाय झालेला पाऊस

शहादा तालुक्यातील शहादा मंडळात 54 मिमि, कलसाडी मंडळात 23 मिमि, प्रकाशा येथे 3 मिमि, ब्राह्मणपुरी येथे 62 मिमि, म्हसावद येथे 37 मिमि, मोहिदे त.श. येथे 58 मिमि, वडाळी येथे 66 मिमि, असलोद येथे 72 मिमि, मंदाणा येथे 85 मिमि, सारंगखेडा येथे 61.8 मिमी पाऊस नोंदवण्यात आला. तालुक्यात एकूण 521.8 मिमी पाऊस झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com