निकामी वस्तुंपासून बनवले हॅण्ड फ्री सॅनिटायझर स्टॅण्ड
नंदुरबार

निकामी वस्तुंपासून बनवले हॅण्ड फ्री सॅनिटायझर स्टॅण्ड

अक्कलकुवा आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कामगिरी

Rajendra Patil

नंदुरबार-प्रतिनिधी Nandurbar

अक्कलकुवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी स्क्रॅब मटेरियलपासून हॅण्ड फ्री सॅनियझर स्टॅण्डची निर्मिती केली आहे. या उपकरणाचे उद्घाटन प्राचार्य अभयकुमार तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोविड १९ या संसर्गजन्य आजारापासून अक्कलकुवा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व निदेशक, कर्मचारी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणारे प्रशिक्षणार्थी यांचे परिपूर्ण संरक्षण व्हावे, तसेच हा संसर्गजन्य विषाणू संस्थेच्या आवारात पसरू नये, म्हणून संस्थेच्या कार्यशाळा विभागामध्ये फिटर निदेशक मयुर काळे, गोपाळ सामुद्रे, वेल्डर निदेशक पी.एच.पाटील, प्रशिक्षणार्थी मक्राणी यांच्या संकल्पनेतून व प्रभारी प्राचार्य अभयकुमार तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेमधील खराब व जुने निकामी झालेल्या स्क्रॅब मटेरियलपासून हॅण्ड फ्री सॅनियझर स्टॅण्डची निर्मिती करण्यात आली आहे.

सदर सॅनिटायझर स्टॅण्डला पायाने खाली दाबले की वरच्या बाजूस सॅनियटाझर बॉटलमधून हॅण्डवॉश सॅनिटायझर लिक्वीड बाहेर पडते. त्यामुळे संस्थेतील इतर कोणत्याही कर्मचार्‍यांशी सरळ संपर्क होत नाही. सर्व कर्मचारी परिपूर्ण सुरक्षितपणे राहतात.

संस्थेतील सर्व कर्मचारी हे सोशल डिस्टन्ससिंंगचे पालन करून, मास्क घालून व शासनाने घालून दिलेल्या अटी, सुरक्षित नियमांचे पालन करून आपले दैनंदिन कामकाज व इतर कामे ही सुरक्षितपणे करीत आहेत.

सदर हॅण्डफ्री सॅनिटायझर स्टॅण्डचे उद्घाटन प्राचार्य अभयकुमार तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्टॅण्ड कार्यालय, प्रशिक्षण विभाग, तसेच कार्यशाळेतील प्रत्येक विभागामधील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवण्यात आले आहे. या सर्व उपक्रमातून संस्थेने स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याचा एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com