केशकर्तन व्यावसायिकांना समाजातर्फे आर्थिक मदत

नाभिक समाज पंच मंडळाच्या बैठकीत एकमुखी निर्णय, दोन तालुक्यातून पाच लाखाचा निधी जमा
केशकर्तन व्यावसायिकांना समाजातर्फे आर्थिक मदत
देशदूत न्यूज अपडेट

शहादा | ता.प्र.- SHAHADA

कोविड-१९ प्रतिबंधक कायद्यानुसार नाभिक समाजातील केशकर्तन व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत.परिणामी अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने समस्त गुजर नाभिक पंच मंडळाच्या बैठकीत समाज बांधवांना मदतीचा हात देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. शहादा भागातून २ लाख ८८ हजार १०० रुपये, नंदुरबार भागातून १ लाख ४९ हजार व भालेर भागातून ९५ हजार अशी एकूण ५ लाख ३२ हजार १०० रुपयांची भरघोस आर्थिक गोळा झाली आहे.

जागतिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० ते आजपावेतो शासनाने संपूर्ण लॉकडाऊन, संचारबंदी, कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात पूर्णपणे नाभिक व्यवसायावर बंदी केल्यामुळे त्यावर आधारित ग्रामीण व शहरी भागातील दैनंदिन रोजीच्या भरवशावर केशकर्तन, मोलमजुरी करून हातावर पोट भरून गुजराण करणार्‍या, दुसर्‍या कोणत्याही उत्पन्नाची साधने नसणार्‍या केवळ नाभिक व्यवसायावर कुटुंब अवलंबून असलेल्यांना उपासमार सहन करावी लागत आहे.

त्यातच घरभाडे, दुकानाचे भाडे, लाईट बील, बँकेचे कर्ज, आरोग्याचा खर्च, कुटुंबाचे गुजरणीचे दैनंदिन खर्च कसे भागवावे, पोट कसे भरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनपासून ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे आर्थिक विवंचनेतून अनेक नाभिक व्यावसायिकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपविली आहे. तसेच अनेक समाज बांधवांना कोरोना संसर्गाने बाधित होवून ते मृत्युमुखी पडले आहेत.

दुर्बल घटक, नाभिक कारागीर व समाज बांधवांच्यासमोर बिकट परिस्थिती व मोठे आर्थिक संकट निर्माण झाली आहे. सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारु नये म्हणून शासन, प्रशासकिय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार आर्थिक मदतीसाठी निवेदने देवून ही त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.

शासनाची मानवतावादी लोककल्याणाच्यादृष्टीने मदत अपेक्षित होती. मात्र त्याकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे अखेर शासकीय मदतीसाठी अवलंबून न राहता संकटात सापडलेल्या आपल्या समाज बांधवांना शहादा येथील रामदेवबाबा नगरतील श्री.संतसेना महाराज समाज भवन येथे समस्त गुजर नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली पंच मंडळाची सभा घेण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष नगीन सोनवणे, दिलीप साळुंके, सचिव परमेश्वर चव्हाण, सहसचिव विजय परमारकर, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, भरत सोनवणे, लाला कन्हैय्या, नारायण सोनवणे, विभागीय अध्यक्ष खुशाल सोनवणे, शरद सोनवणे, पमन सोनवणे, प्रा.अनिल साळुंके, हेमराज पवार, शरद सोलंकी आदी उपस्थित होते.

समाज सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे, या ब्रीद वाक्यानुसार या बैठकीत समाज बांधवांना लोकवर्गणीतून मदत करण्याचे एकमताने विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र , गुजरात व मध्यप्रदेश अश्या तीन राज्यात वसलेल्या गुजर नाभिक समाज बांधवांना शहादा भागातून २ लाख ८८ हजार१०० रुपये , नंदुरबार भागातून १ लाख ४९ हजार व भालेर भागातून ९५ हजार अशी एकूण ५ लाख ३२ हजार १०० रुपयांची भरघोस आर्थिक मदत विशेष सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

याशिवाय कोरोना संक्रमण प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबियांना घरपोच प्रत्येकी पाच हजार रूपये सामाजिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. यानुसार गुजर नाभिक समाजातील जे समाज बांधव कोरोना संक्रमणाने निधन झाले. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दि. २५ मे २०२१ पावेतो नावे सचिव परमेश्वर चव्हाण यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वीही समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाने लॉकडाऊन काळात अत्यंत गरजू समाज बांधवांना जीवनाश्यक किराणा साहित्याचे किट विविध संस्था व मंडळाच्या सहाय्याने वाटप करण्यात आले, आतापावेतो सात सामुदायिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून नाममात्र एक रुपयात ९९ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेतून वधू मातेला दहा हजार रूपयाचे अनुदान मिळवून दिले,

मातृ-पितृ छत्र हरपलेल्या पाल्यांना शैक्षणिकदृष्टया दत्तक घेणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-शैक्षणिक साहित्य वाटप करणे, नाभिक कारागीर पतसंस्थेमार्फत मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक वादाचे सामोपचाराने तंटा मुक्ती करणे, पूरग्रस्त व भूकंपग्रस्त लोकांना मदत करणे यासारखी अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com