तळोदा येथे पावणे दोन लाखाचा गुटखा जप्त

एकास अटक, एलसीबीची कारवाई
तळोदा येथे पावणे दोन लाखाचा गुटखा जप्त
तळोदा येथे जप्त करण्यात आलेला गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक.

मोदलपाडा | वार्ताहर - Modalpada

नंदुरबारहुन तळोदामार्गे ब्राम्हणपुरी (ता.शहादा) येथे जाणारा अवैध विमल गुटख्याची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हातोडा रस्त्यावरील सी.के.पेट्रोल पंपासमोर पकडला. यात १ लाख ८२ हजार ६०० रुपयांच्या गुटख्यासह एकूण ४ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असतांना मानवी जिवीतास अपायकारक असल्याची जाणीव असतांना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हातोडा रस्त्यावर सापळा रचला.

यावेळी नंदुरबारहुन तळोदामार्गे ब्राम्हणपुरी (ता.शहादा) येथे टाटा कंपनीची मेगा एक्सल मालवाहू ट्रक (एम.एच.३९ ए.डी.०१५८) या गाडीमध्ये ३३ हजार रुपयांचे पांढरे प्लास्टिकचे बारदान, १ लाख ४९ हजार ६०० रुपयांचे चार खाकी रंगाचे बारदान, केसरयुक्त विमल पान मसाल्याचे २०० पाऊच प्रमाणे ८०० पाऊच प्रत्येकी १८७ रुपये छापील किंमतीप्रमाणे व ३ लाख रुपयांची टाटा कंपनीची मेगा एक्सएल मालवाहू ट्रक असा एकूण ४ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा माल स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस नंदुरबार शाखेने तळोदा हातोडा रस्त्यावरील सीके पेट्रोल पंपासमोर पकडला. गाडीसह ४ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रोनक जैन याला अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रोनक पारसमल जैन (वय २१ रा. ब्राम्हणपुरी ता.शहादा) याच्यावर पो ना सुनील तेजबसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम १८८, २७२, २७३, ३२८ यांसह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक योगेश राऊत, पो.ना.युवराज चव्हाण, पो.ना. सुनील पाडवी, पो.ना.राकेश वसावे यांनी ही कारवाई केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे हे करीत आहेत.

राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. प्रत्यक्षात मात्र कायदा धाब्यावर बसवून तळोदा शहरात व तालुक्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस विक्री सुरूच आहे.

युवापिढी तंबाखूजन्य उत्पादनात गुटख्याचा वापर करीत आहेत. मात्र, बंदी येण्यापूर्वीच गुटखा निर्मात्यांनी पान मसाला बनवणे सुरु केले. तरुणपिढी पान मसाल्यासह तंबाखू खाऊ लागली. बंदीपूर्वीपेक्षाही बंदीनंतर गुटख्याची निर्मिती व विक्री पूर्वीपेक्षा वाढली आहे.

गुटखा बंदीचा कायदा कडक करण्यासाठी गुटखा तयार करणारे आणि विक्रेते यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद केली आहे.प्रत्यक्षात मात्र कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com