14 लाखाचा गुटखा जप्त
नंदुरबार

14 लाखाचा गुटखा जप्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

गुरांच्या खाद्याच्या आड लपवून गुटख्याची चोरटी वाहतून करणार्‍या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून 13 लाख 72 हजार 800 रुपये किमतीचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबारमार्गे नगर येथे टाटा आयसर प्रो क्रमांक (एम एच 16 सी सी 8624) ने गुरांच्या खाद्याच्या आड लपवुन चोरटी वाहतुक करुन जास्त दराने विक्री करणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारेपोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर एस नवले यांच्या पथकाने आज दि.20 ऑगस्ट रोजी पहाटेपासून नंदुरबार शहरात निझर रोड वर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा रचला. पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास निझर गावाकडुन एक टाटा कंपनीचा आयसर वेगाने संशयितरित्या येतांना दिसुन आल्याने पोलीसांनी वाहन उभे केले.

वाहनाचे कॅबिनमध्ये असलेले चालक भास्कर विजय भोसले वय 25 रा. रामपुर ता.राहुरी जि.नगर व महम्मद अझरुद्दीन शकील शेख वय 29 रा. दावल मलिक चौक, नागापूर, नगर यांना मालबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतू पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुरांच्या ढेपच्या गोण्याच्या खाली खाकी रंगाचे व पांढर्‍या रंगाचे प्लास्टीकचे पोते दिसल्याने त्यांना उघडुन पाहिले असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गटखा मिळून आला.

संशयिता सदर विमल गुटखा बाबत विचारपुस केली असता, त्यांनी गुजरात मधील निझर या गावातुन भावेश उर्फ शितल अग्रवाल रा. निझर (गुजरात) यांच्या गोडाऊन मधुन टाटा आयसर गाडी मध्ये भरुन नंदुरबार मार्गे अहमदनगर येथील राहणारा मोहसिन पटेल रा. एमआयडीसी नगर याच्या सांगण्यावरुन त्याच्याकरीता वाहतुक करीत असल्याचे सांगितले. याबाबत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनात 11 लाख 66 हजार 880 रुपयांचा विमल गुटख्याचे 30 खाकी रंगाचे सुतळी पोते, 2 लाख 5 हजार 920 रुपये किमतीच्या व्ही-1 तंबाखुच्या एकुण 30 पांढर्‍या रंगाचे नायलॉनचे पोते, एक पांढर्‍या रंगाची टाटा आयसर प्रो गाडी, 30 हजार रुपये किंमतीचे सँमसंग कंपनीचे दोन मोबाईल, 27 हजार रुपये किंमतीची गुरांची ढेपचे 26 लहान मोठे पोते असा एकुण 26 लाख 29 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर माल भास्कर विजय भोसले, महम्मद अझरुद्दीन शकील शेख, भावेश उर्फ शितल अग्रवाल रा.निझर (गुजरात), मोहसिन पटेल रा.एमआयडीसी, नागापर,नगर यांनी संगनमत करुन भावेश उर्फ शितल अग्रवाल याच्या निझर येथील गोडाऊनमधुन विमल गुटखा भरुन घेवुन दि.20 ऑगस्ट 2020 रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास गुजरातमधील निझरकडुन नंदुरबार शहराकडे येत असतांना निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ वरील वर्णनाचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटखा पानमसाला तंबाखुचे अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने टाटा आयसर गाडीत मध्ये चोरटी वाहतुक करतांना गुरांच्या खाद्य (ढेफ) च्या नावाखाली मिळुन आल्याने त्यांच्याविरुद्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर कारवाई किशोर नवले, पोहेकॉ मुकेश तावडे, पोना राकेश मोरे, पोना राकेश वसावे, पोना दादाभाई मासुळ, चापोना महेंद्र सोनवणे,पोशि आनंदा मराठे, पोशि राजेंद्र काटके, पोशि किरण मोरे, पोशि अभय राजपुत यांच्या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com