नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

सालाबादप्रमाणे यावर्षीही नंदुरबार डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय सेनेचे हवालदार राजेंद्रसिंह आणि हवालदार भगत होते, ज्यांना चीनविरुद्धच्या गलवान व्हॅली संघर्षात केलेल्या पराक्रमी कामगिरी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. उद्घाटन सामन्यात डॉ. योगेश देसाई यांच्या दबंग्स संघाने डॉ.शिरीष शिंदे यांच्या निम्स संघाला 23 धावांनी नमवले.

टूर्नामेंटमध्ये नंदुरबार शहर आणि परिसरातील विविध पॅथीचे डॉक्टर्स एकत्रितपणे भाग घेतात. दरवर्षी 60 पेक्षा जास्त डॉक्टर्स 4 टीम्स मध्ये विभागले जातात. एरवी दिवसभर तहानभूक हरपून दिवसरात्र जनतेची आरोग्य सेवा करणारे प्रायव्हेट आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टरी क्षेत्र महिनाभर क्रिकेटमय होते. सुंदर खेळाबरोबर उत्तम फिटनेस आणि खेळभावना या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

कोरोना संक्रमण काळात नंदुरबार डॉक्टर्सनी दिवसरात्र निरंतर जनतेची सेवा केली. ज्यामुळे कोरोना वर बर्यापैकी नियंत्रण मिळवता आले. डॉक्टर्सच्या तणावमुक्ती आणि स्वस्थ जीवनशैलीसाठी या टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी 7 ते 9 या वेळेत दररोज एक मॅच दि.12 ते 24 फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.

शेवटच्या दिवशी फायनल मॅच आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.या स्पर्धेसाठी डॉ.योगेश देसाई यांचा देसाई दबंग्स्, माडाचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी यांचा सातपुडा टायगर्स, निम्स सर्जीकल स्ट्राईक्स व स्मित वॉरीयर्स या चार संघांचा समावेश आहे.

सदर स्पर्धेस आयएमए, निमा, आयडीए आणि होमिओपॅथी असोसिएशनचे सहकार्य लाभले. शहरातील समाजसेवी संस्था लायन्स क्लब, रोटरी क्लब, मॉर्निंग क्रिकेट क्लब हे सुध्दा सर्वोतोपरी स्पर्धेसाठी मदत करतात. कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुरेंद्र छिंकारा, विलास रघुवंशी, आयएमएचे डॉ.राजेश वळवी, स्मित हॉस्पिटलचे संचालक डॉ.विशाल चौधरी, लायन्स क्लबचे डॉ.राजेश कोळी, समीर शाह, शेखर कोतवाल, राजेंद्र माहेश्वरी आणि आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहूल पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय पटेल, डॉ.रवींद्र पाटील, डॉ.ज्ञानेश्वर पाटील, डॉ.हेमंत चौधरी, डॉ.प्रसाद पटेल, डॉ.भालचंद्र पाटील, डॉ.भूपेंद्र पटेल, डॉ. दिनेश पाटील, डॉ.अमोल पाटील आणि डीपीएल कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले.