लसीकरणात चांगली कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायतींचा सत्कार

राज्य शासनातर्फे प्राप्त झालेल्या सात रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
लसीकरणात चांगली कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायतींचा सत्कार

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते गावात 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे करोना लसीकरण करणार्‍या सिंदगव्हाण, सागाळी आणि पुरुषोत्तम नगर या तीन ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा.डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्ष सीमा वळवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते. या तिन्ही ग्रामपंचायतींची कामगिरी इतरांना प्रेरक आहे. येथील सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांनी परिसरातील इतर गावानाही लसीकरण वाढविण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे यावेळी अ‍ॅड.पाडवी यांनी सांगितले. एकाच दिवसात 813 जणांचे लसीकरण करणार्‍या भगदारी गावातील लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

सिंदगव्हाण ग्रामपंचायतीने 45 वर्षावरील 431 नागरिकांचे, सागाळी गावाने 331 आणि पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीने 337 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी आणि मुख्याध्यापक यांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरविण्यात आले.

रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते राज्य शासनातर्फे प्राप्त झालेल्या 7 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खा.डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्ष सीमा वळवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य होईल, असा विश्वास अ‍ॅड.पाडवी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेता येईल. कोरोना बाधितांनादेखील यामुळे चांगली सुविधा उपलब्ध होईल. आपल्या आमदार निधीतून 6 आणि आ.नाईक यांच्या आमदार निधीतून 7 रुग्णवाहिका मिळणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल. सर्व मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. आ.राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतूनदेखील यापूर्वी 4 रुग्णवाहिका घेण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यासाठी करोना संकटकाळात विविध माध्यमातून 49 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 7 रुग्णवाहिका यापूर्वी शासनातर्फे प्राप्त झाल्या असून इतर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधी व विविध संस्थांकडून प्राप्त झाल्या आहेत. आज प्राप्त रुग्णवाहिका कोपर्ली, मोरंबा, सुलवाडा, कुसुमवाडा, झामणझर, काकडदा, चुलवड येथील आरोग्य केंद्रांसाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत.

नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर अ‍ॅम्ब्युलन्स ट्रॅकींग सिस्टीम विकसीत करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील रुग्णवाहिकेची माहिती आणि चालकाचा क्रमांक तात्काळ मिळू शकेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com