मनरद येथे भल्या पहाटे घरफोडी

सहा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
मनरद येथे भल्या पहाटे घरफोडी

शहादा | ता.प्र.- SHAHADA

तालुक्यातील मनरद गावात भरवस्तीतील एका घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तिजोरी तोडून दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. बाजार भावाप्रमाणे सुमारे सहा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरटयांनी लंपास चोरून नेला. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनरद हे सुमारे अडीच ते तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात संजय मगन पाटील यांचे भरवस्तीत घर आहे. श्री. पाटील यांच्या नातलगाकडे लग्न लग्नाची तारीख निश्चित झालेली होती.

यानिमित्ताने संजय पाटील यांनी त्यांच्या पत्नीकरिता घेतलेल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची पोत असे सुमारे दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने आणून कपाटात ठेवलेले होते.

दोन दिवसापूर्वी पाटील यांचा मुलगा व सून सुरत येथे खाजगी कामानिमित्त निघून गेले होते. घरात वृद्ध वडील, आई हे खालच्या रूममध्ये झोपत असे तर संजय पाटील व त्यांच्या पत्नी या वरच्या मजल्यावर रात्री झोपण्यास गेले होते.

संजय पाटील यांच्या पत्नी पहाटे साडेतीन चार वाजेच्या दरम्यान उठून दैनंदिन कामकाज करत असतात. सोमवारी पहाटे उठल्यानंतर त्यांना घराचा मागचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तातडीने त्यांच्या सासूबाई व सासर्‍यांना उठवून दरवाजा उघडण्याबाबत विचारणा केली.

मात्र, त्यांनी उघडला नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी पतीला हाक मारून घटनेची माहिती दिली. घरात येऊन पाहतात तर कपाट व तिजोरी उघडे आढळून आले. तिजोरीतील दहा तोळे सोन्याच्या वस्तू या चोरीस गेल्याचे लक्षात येताच संजय पाटील यांनी तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती देऊन सकाळी शहादा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली.

शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश वाघ व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. याचवेळी नंदुरबार येथील श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

भरवस्तीत असलेल्या संजय पाटील यांच्या घरातून सोन्याच्या दहा तोळे बाजारभाव किंमत सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या ऐवज चोरीला गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अगोदरच गेल्या दीड वर्षापासून शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. उत्पन्न असले तरी मालाला भाव नाही शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे.

अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या घरातून सोन्याच्या ऐवज चोरीला गेल्याने शेतकरी संजय पाटील व कुटुंब हतबल झाले आहेत. पोलिस प्रशासनाकडून या घटनेची चौकशी होऊन आरोपीला पकडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

दरम्यान शहरात दोन दिवसापूर्वी ही एका घरात धाडसी चोरी झाली होती. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण वाढल्याने गस्त कमी झाली आहे, त्याचा गैरफायदा चोर घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com