आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळांसाठी 550 कोटीची तरतूद

आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी यांचे प्रतिपादन
आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळांसाठी  550 कोटीची तरतूद

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळेसाठी 550 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. आश्रमशाळेच्या माध्यमातून सक्षम आणि स्वयंपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकावर आधारीत शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे असा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी यांनी केले.

आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत तळोदा तालुक्यातील राणीपूर येथील माध्यमिक आश्रमशाळा नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, आ.राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, तहसिलदार गिरीष वखारे आदी उपस्थित होते. अ‍ॅड.पाडवी म्हणाले, शैक्षणिक विकासाबरोबर समाजाचा विकासही महत्वाचा आहे आणि त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळांसाठी 550 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगला गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येत आहे.

पालकांनी आश्रमशाळेतील सुविधांचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी मुलांना अधिकाधिक शिक्षण घेवू द्यावे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, जीवनात शिक्षणाला खुप महत्व आहे. मागच्या पिढीने प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले.

त्या तुलनेत आज चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग करुन शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाचे ध्येय गाठावे.

अडीच ते सहा वयोगटातील मुलांसाठी आश्रमशाळेत नर्सरीची सुविधा आणि पहिली ते पाचवीतील शिक्षण इंग्रजीतून देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

राणीपूर येथे मुलांच्या वसतिगृहालाही मंजूरी देण्यात येईल असे पालकमंत्री म्हणाले. नकट्यादेव ते गोर्‍यामाळ या 13 कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे लवकरच भूमीपूजन करण्यात येईल असे त्यानी सांगितले.

अ‍ॅड.वळवी म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेवून बदलत्या काळानुसार नवे तंत्र आत्मसात करावे. नव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यातुन गुणवत्ता वाढीला चालना मिळेल. शिक्षकांनी नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्यूक्त करावे.

आ.पाडवी म्हणाले, आश्रमशाळेमुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. संगणकीय सुविधेचा लाभ घेवून चांगले अधिकारी घडतील.

पालकांनी आपली मुले शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.डॉ.भारुड म्हणाले 9 कोटी खर्च करुन ही सुसज्ज इमारत तयार करण्यात आली आहे.

आश्रमशाळेच्या माध्यमातून चांगले इंजिनिअर, डॉक्टर आणि अधिकारी घडावे असे प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांनी चिकाटीने प्रगतीचा ध्यास करावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे.माजी मंत्री वळवी यांनी स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी घडविण्यासाठी आश्रमशाळेतील सुविधा उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात श्री.पंडा म्हणाले तळोदा प्रकल्पातंर्गत आठ आश्रमशाळा इमारतींना मंजूरी मिळाली असून आणखी पाच इमारतींना मंजूरी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. राणीपूर आश्रमशाळेत प्रयोगशाळेसह 11 वर्गखोल्या, संगणक कक्ष, आणि मुलींचे वसतिगृह आहे. यासुविधेचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com