मी नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगतो तुम्ही नगरसेवकांना सांगा

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे खा.डॉ.हीना गावितांना आव्हान
मी नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगतो तुम्ही नगरसेवकांना सांगा

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

मी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांना राजीनामा देण्यास सांगतो, तुम्ही तुमच्या ११ नगरसेवकांना राजीनामा देण्यास सांगा.

माझी पत्नी माझे ऐकेल, तुमचे किती नगरसेवक ऐकतात, ते बघा. त्यानंतर निवडणूक घेवून एकदा कोणाचे काय कर्तृत्व आहे हे सिद्ध होईल, असे आव्हान माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे दिले.

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी खा.डॉ.हीना गावित यांना उद्देशून म्हणाले, मोदी साहेबांमुळे आपण २०१४ व २०१९ च्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहात. त्यांची लाट होती, त्या लाटेत येडेगबाळे पण निवडून आले आहेत, तुम्ही तर डॉक्टर आहात.

प्रत्येकाने मोदींना मत दिले. तुम्हाला नाही. त्यामुळे आपल्या परिवाराची लोकप्रियता आहे. या भ्रमात राहू नका. मात्र, तुमच्या निवडीचे श्रेय त्यांनाही देत नाही, हे दुर्देव आहे. आपण सौ.रत्ना रघुवंशींना नगराध्यक्षपदावरुन अपात्र करा अशी मागणी होती.

त्यावर जिल्हाधिकारी काहीच कारवाई करत नाही म्हणून तुमचे बिनसले आहे, का? मात्र, नगराध्यक्षांना अपात्र करण्यासाठीचे प्रकरण मंत्र्यांकडे असतांना जिल्हाधिकारी त्यांना अपात्र कसे करु शकतात. मीदेखील शासनाच्या निकालाची वाट पाहत आहे.

मात्र, तुमच्या ११ नगरसेवकंानी नगरपालिकेच्या हिताच्या विरोधात वागले म्हणून त्यांना अपात्र करण्याची मागणीही केली आहे. तसे असेल तर मी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांना राजीनामा देण्यास सांगतो, तुम्ही तुमच्या ११ नगरसेवकांना राजीनामा देण्यास सांगा.

माझी पत्नी तर माझे ऐकेल पण तुमचे नगरसेवक तुमचे ऐकतील का? त्यानंतर निवडणूक होवून जावू द्या मग समजेल कोणाचे काय कर्तृत्व आहे.

श्री.रघुवंशी म्हणाले, विरचक धरणाला कोणी जमिन देत नव्हते, त्यावेळी रघुवंशी परिवाराने शहराला पाणी मिळावे विरचक धरणासाठी ६० ते ७० एकर जमिन दिली होती. मात्र, या जमिनीवर काही ठिकाणी धरणाचे पाणी येत नाही.

त्याठिकाणी १९९५ पासून जागल्यासाठी मातीचे घर तयार केले होते. २००० मध्ये त्याठिकाणी दुमजली इमारत बांधली. ती जमिन अधिग्रहीत झाली. मात्र त्या जमिनीवर अतिक्रमण नाही. ज्या उद्देशाने जमिन अधिग्रहण केली असेल आणि तो साध्य होत नसेल तर त्या शेतकर्‍याला ती जमिन परत करावी, असा कायदा आहे.

श्री.रघुवंशी म्हणाले, आपण नगरपालिकेत २०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याने ईडीची चौकशी करण्याची मागणी करतात. मात्र, २०० कोटीची कामे झाली आहेत भ्रष्टाचार नाही. अनियमतता म्हणू शकतात.

उलट आदिवासी खात्यातील ६ हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची ईडी चौकशी व्हायला हवी. रघुवंशी परिवाराला जेलमध्ये टाकेल त्याच संस्थेकडून चौकशीची मागणी करा. कारण वाल्याचा वाल्किमी करण्याचा कारखाना भाजपा होती.

तुम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांनी क्लिन चिट दिली आहे. न्यायालयाने नाही. तत्कालीन जेष्ठ खासदार माणिकराव गावीत यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची क्लिप व्हायरल झाली होती.

त्यावेळी सत्ताधार्‍यांसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून माणिकराव गावीत असे करुच शकत नाही असे जाहीर केले होते. याला क्लिन चिट म्हणतात, असेही ते म्हणाले

श्री.रघुवंशी पुढे म्हणाले, माझ्या मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी डोनेशन दिले. माझ्या मुलीला दरवर्षी १७ लाख याप्रमाणे ५१ लाख रुपये फी भरली आहे. तुमचा हा खर्च शासनाने केला आहे. म्हणून तुम्ही सिव्हीलला सेवा करण्याची मागणी करत होतो.

तुमच्या धाकात तरी बाकीच्या डॉक्टरांनी चांगली सेवा दिली असती. मात्र, तुम्ही चुकीचा अर्थ काढला. तुमचा आणि जिल्हाधिकार्‍यांचा काय वाद आहे. जिल्हाधिकारी माझ्या पत्नीला अपात्र करत नाही म्हणून वाद आहे की फार्म हाऊस पाडत नाही म्हणून वाद आहे, हे कळत नाही.

श्री.रघुवंशी म्हणाले, रेमडिसिवीर आवश्यक असल्यास उसनवारी तत्वावर देता येते हे शासन म्हणते. पण खाजगी वैद्यकीय व्यवसायाकडे उपलब्ध झाल्यास ते इंजेक्शन परत घेणे आवयक आहे.

वैद्यकीय व्यवसाय म्हणून रोटरी वेलनेस सेंटरला जिल्हाधिकार्‍यांनी रेमडिसिवीर दिले. पण सत्य जाणून घ्यायचे नाही, आणि बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. नगराध्यक्षांनीदेखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पत्र पाठवून ५ हजार रेमडिसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी पत्र दिले आहे. त्याचे उत्तर आलेले नाही.

जिल्हाधिकारी जर चांगले काम करत असतील तर त्यांचे कौतूक केलेच पाहिजे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे माझे कर्तत्य आहे.

आपणही द्वेशाने न बोलता कोरोनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करावा, असे आवाहनही श्री.रघुवंशी यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com