अखेर पाचव्या दिवशी ‘त्या’ बालिकेचा मृतदेह आढळला

मोटरसायकलस्वारांनी खेडले-पिसावर रस्त्यावरील दादरच्या शेतात फेकले
अखेर पाचव्या दिवशी ‘त्या’ बालिकेचा मृतदेह आढळला

बोरद, ता.तळोदा | वार्ताहर- TALODA

मोड ते तळोदा दरम्यान असणार्‍या कढेल फाट्याजवळ मंगळवारी अज्ञात दुचाकीस्वाराने ऊस तोड करणार्‍या मजुराच्या दहा वर्षीय बालिकेला धडक देऊन जखमी केले होते. त्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने ते दुचाकीस्वार तिला घेऊन फरार झाले होते. तेव्हापासून बालिका बेपत्ताच होती. अखेर आज पाचव्या दिवशी खेडले-पिसावर रस्त्यावर दादरच्या शेतात या बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील काकडद्याच्या घाटली-आगरीपाडा येथील मोत्या काल्या पटले हे ऊसतोड मजूर नोव्हेंबर महिन्यापासून तळोदा-बोरद रस्त्यालगत कढेल फाट्याजवळील शेतात वास्तव्यास आहेत.

त्यांच्यासह १४-१५ कुटुंबीय असून ते ऊसतोडणीचे काम करतात. दि.१९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हे ऊसतोड मजूर नेहमीप्रमाणे ऊस तोडून गाडी काम करत होते. त्याचवेळी मुन्नी मोत्या पटले ही दहा वर्षीय बालिका रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात लहान चुलत भावासोबत पाणी भरण्यासाठी गेली होती.

पाणी भरून ती रस्ता ओलांडत असतांना मोडकडून तळोदाकडे भरधाव वेगात जाणार्‍या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वारांनी तीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुन्नी ही काटेरी झुडपांमध्ये फेकली गेल्याने तिला जबर दुखापत झाली व तिच्या नाका तोंडातून रक्त येण्यास सुरुवात झाली.

यानंतर भयभीत झालेले दुचाकीस्वार मुन्नीला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून मोटारसायकलवर बसवून फरार झाले होते. गेल्या पाच दिवसांपासून पोलीस या बालिकेचा व मोटरसायकलस्वारांचा शोध घेत होते.

परंतू यश येत नव्हते. पालकांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर शोध कार्याला गती मिळाली. पोलीसांकडून बालिकेच्या शोधासाठी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी तीन पथके तयार केली होती.

या पथकांनी जिल्हयालगत असलेल्या मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील जवळच्या गावांसह जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात देखिल बालिका व आरोपींचा शोध घेतला.

तिचे पालक व नातेवाईकांकडून देखील खेडोपाड्यात व विविध शहरात बालिकेच्या शोध घेणे सुरू होते. परिसरातील सर्वच शासकीय खाजगी दवाखान्यात पोलिसांनी शोध घेतला, जिल्हाबाहेरदेखील शेजारील गावांना पोलीस पथके पाठवून ही शोध मोहीम राबविली. मात्र इतर कोणत्याही ठिकाणी बालिका आढळून आली नाही.

अखेर आज पाचव्या दिवशी गुजरात परीसरातील खेडले-पिसावर रस्त्यावरील टॉवरलाईनचा पुनर्वसीत शेतात मजुरीला जात असताना शेत मजुरांना या बलिकेचा मृतदेह दादरच्या शेतात आढळून आला. तिच्या पोटाला, डोक्याला जबर मार लागला असल्याने अधिक रक्तस्त्रास होवून या बालिकेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com