खरीप हंगामासाठी 31 हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध

उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती द्या - अ‍ॅड.के.सी.पाडवी
खरीप हंगामासाठी 31 हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

खरीप हंगाम 2021-22 साठी 21 हजार 984 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तसेच 1 लाख 28 हजार 460 मे.टन खतांची मागणी असून 31 हजार 146 मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे आणि 96 हजार 20 मे.टन आवंटन मंजूर करण्यात आल्याची माहिती खरीप हंगामपूर्व बैठकीत देण्यात आली.

दरम्यान, पीक उत्पादन वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकर्‍यांना माहिती द्यावी. त्यादृष्टीने उत्तम गुणवत्ता असलेल्या बियाण्यांचा उपयोग करावा, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प.अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, खा.डॉ.हिना गावीत, आ.सुधीर तांबे, आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड.पाडवी म्हणाले, उत्पादन वाढीच्यादृष्टीने संशोधन करणार्‍या संस्थांनाही प्रोत्साहन देण्यात यावे. उत्पादन वाढीच्या चांगल्या प्रयोगांची माहिती शेतकर्‍यांना द्यावी.

शेतकर्‍यांना वितरकांकडून मागणीनुसार अपेक्षित बियाणे उपलब्ध होतील याविषयी दक्षता घ्यावी. एरंडी पीकासारख्या अपारंपरिक पिकांची लागवड करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याबाबत शक्यतांची पडताळणी करावी व माहिती घ्यावी. शेताच्या बांधावर फळझाडे लावण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहीत करावे. रोपवाटीकेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात खतांचा पुरवठा होण्याबाबत योग्य नियोजन करावे. युरीयाच्या योग्य वापराबाबत शेतकर्‍यांना माहिती देण्यात यावी.

डाब येथील शेतकर्‍यांच्या ठिबक सिंचनासाठीच्या कर्जाबाबतच्या तक्रारीबाबत त्वरीत माहिती घेण्यात यावी. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

दुर्गम भागातील बँक शाखा सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा. पर्जन्यमापक सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.

नंदुरबार येथे रेल्वेचा रॅकपॉईंट सुरू झाल्याची माहिती यावेळी खा.डॉ.गावीत यांनी दिली. मृदा आरोग्य पत्रिकेनुसार शेतकर्‍यांना योग्य पिक व खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन करावे. तालुकानिहाय खतांच्या मागणीनुसार समप्रमाणात पुरवठा व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी रोपवाटीका लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन-तीन गाव निवडून तिथे फळबाग लागवड केल्यास इतरही गावांना ते मार्गदर्शक ठरेल, असे डॉ.भारुड यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2021-22 साठी 21 हजार 984 क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तसेच 1 लाख 28 हजार 460 मे.टन खतांची मागणी असून 31 हजार 146 मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे आणि 96 हजार 20 मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात बियाणांसाठी 382, रासायनिक खतांसाठी 287 आणि किटनाशकांसाठी 305 परवानाधारक वितरक आहेत. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत 19 कोटी 47 लाख रुपये खर्च झाला आहे. गतवर्षी 357 कोटी 19 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप झाले असून यावर्षी 654 कोटी 48 लक्ष एवढा लक्षांक निर्धारीत करण्यात आला आहे. यावर्षी पिकांच्या वाढीनुसार खतांचा वापर करण्यासाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com