बहुरुपा शिवारात शेतकर्‍यांनी पाहिला सिंह

बिबटया व मादीचेही दर्शन, तळोदा परिसरात दशहत
बहुरुपा शिवारात शेतकर्‍यांनी पाहिला सिंह

सोमावल/मोदलपाडा - वार्ताहर | वार्ताहर TALODA

वनविभागाच्या (Forest Department) जंगलालगत असलेल्या बहुरुपा येथील शेतशिवारात बिबट्याच्या जोडप्यासह चक्क सिंह (Leo) पाहिल्याचा दावा दोघा शेतकरी बंधू व रखवालदारांनी केला आहे. शंभर फुटावर असलेल्या बांधावर हा सिंह बसलेला होता. तब्बल पाच ते सात मिनीटे या तिघांनी त्याला पाहिले. त्यानंतर घरी परततांना बिबटया व त्याच्या मादीचेही दर्शन या शेतकर्‍यांना झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्राण्यांचे पायाचे ठसे घेतले आहेत.

गेल्या आठवड्यात बिबट्याने तळोदा (Taloda) शहरातील शहादा रस्त्यावरील एका सर्व्हिस स्टेशन जवळ धूम ठोकली होती. त्यावेळी पादचारीचीही सैरभैर झाले होते. त्यामुळे तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचा वार्ता ऐकावयास मिळाल्या होत्या.

मात्र, आज गुरुवारी सकाळी येथील वनविभागाच्या परिसराला लागून असलेले बहुरूपा शिवारातील एका कपाशीच्या शेतात चक्क बांधावर सिंहच बसलेला होता. सुरुवातीला रखवालदाराच्या मुलीस सिंह बसलेला दिसला.

तिथून ती भेदरलेल्या अवस्थेत पळत आली. तिला विचारल्यावर तिने तिकडे बोट दाखवले. तेव्हा शेतमालक उमाकांत शेंडे, शशिकांत शेंडे व रखवालदार रमेश पाडवी हेही पहायला गेलेत. तेव्हा सिंह बांधावर बसलेला होता. त्यांनी पाच ते सात मिनिटे सिंहाची गंमत पाहिली. त्यानंतर तो तेथून जवळच्या ऊसाच्या शेतात निघून गेला.

शेतकरी बंधू म्हशीचे दूध काढल्यानंतर घराच्या दिशेने निघाले असतांना तेथे जवळच लिंबाच्या झाडापाशी बिबट्या व त्याची मादीही त्यांना दिसली. त्यामुळे ते अधिकच घाबरले. ते दुसर्‍या रस्त्याने घरी परतले.

ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोढे, वनपाल वासुदेव माळी, नंदू पाटील, विरसिंग पावरा, लक्ष्मी पावरा यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राण्याच्या पायाचे ठसे घेतले.

शिवाय लिंबाच्या झाडाच्या खुणाही घेतल्या. याबाबत त्यांना विचारले असता पायाच्या ठशावरून सिह असल्याचे सांगता येत नाही मात्र आम्ही सायंकाळी ट्रॅप कॅमेरे (Trap cameras) या ठिकाणी बसवणार असल्याचे सांगितले.

नेहमीप्रमाणे शेतात उभारण्यात आलेल्या गोठ्यातील म्हशीचे दूध काढण्यासाठी गेलो होतो. दूध काढत असतांना रखवालदाराची मुलगी भेदरलेल्या अवस्थेत आली. तेव्हा तिने बोट दाखविले तिकडे गेलो असता आम्ही तिघांनी शंभर फुटावर बांधावर सिंहच बसलेला पाहिला.

- शशिकांत शेंडे, शेतकरी, तळोदा

शेतकर्‍यांनी कळविल्यानंतर पथकासह घटनास्थळी दाखल होऊन जागेची पाहणी केली. त्या प्राण्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले आहे. परंतु त्यावरून सिंहच आहे असे सांगता येणार नाही. परंतु याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यानंतरच वस्तुस्थिती सांगता येईल.

- निलेश रोढे, वनक्षेत्रपाल, तळोदा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com