नंदुरबार

नवापूर तालुक्यातून जाणार्‍या पेट्रोलियम पाईपलाईनच्या कामाला शेतकर्‍यांचा विरोध

अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Ramsing Pardeshi

Nandurbar - नवापूर - श.प्र.

जोपर्यंत शेतकरी व कंपनी यांच्यात तोडगा निघत नाही तोपर्यंत नवापूर तालुक्यातून जाणार्‍या पेट्रोलियम पाईपलाईनचे काम थांबवण्याचे आदेश दिलेले असतांनाही कंपनीने मनमानी पद्धतीने कामाला पुन्हा सुरुवात केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रकल्पाला परिसरातील शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला आहे. सदर पाईपलाईनचा मार्ग बदलून गुजरात राज्यातील सोनगढपासून पिंपळनेर यामार्गाने पाईपलाईन करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेने दिला आहे.

एखाद्या प्रकल्पाला ५० टक्के लोकांचा विरोध असेल तर तो प्रकल्प केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे होऊ शकत नाही. या प्रकल्पाला ९० टक्के शेतकर्‍यांच्या विरोध आहे. म्हणून सदर पाईपलाईनचा मार्ग बदलून पहिल्या सर्वेनुसार गुजराथ राज्यातील सोनगडपासून महाराष्ट्र राज्याच्या पिंपळनेर या मार्गातून पाईप लाईन काढावी. केंद्रीय पेट्रोलीयम पाईप लाईन नवापूर तालुक्यातून जात आहे. या संदर्भामध्ये अनेक वेळा अधिकार्‍यांशी चर्चा झालेली आहे. जोपर्यंत कंपनी आणि शेतकर्‍यांमध्ये तोडगा निघत नाही, तोपर्यंत पाईपलाईनचे काम बंद करण्यात आले होते. परंतु प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता कंपनीच्या अधिकार्‍यांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु केले आहे. ते ताबडतोब बंद करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.
भरत गावीत जि.प सदस्य करंजी बु
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com