नंदुरबार

शिर्वे येथील परीक्षा केंद्र बंद करण्याचा अहवाल

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

तालुक्यातील शिर्वे केंद्रात मोठ्या प्रमाणावर कॉपीचा प्रकार आढळून आल्याने तळोदा उपविभागीय अधिकार्‍यांनी हे केंद्रच बंद करण्याचा अहवाल जिल्ह्याधिकार्‍यांना पाठविला आहे. या अहवालामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या 10वी परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. यासाठी तालुक्यातील शिर्वे केंद्रही उभारण्यात आले आहे. 10 वीच्या पहिल्याच पेपरला येथील उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा यांनी या केंद्राला दुपारी 12.15 च्या दरम्यान भेट दिली असता तेथे कॉपी मोठया प्रमाणात आढळून आली.

जे केंद्र आहे तेथील इमारत आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रमशाळा आहे . ही इमारत गावाच्या अत्यंत निकट आहे. त्यामुळे रहिवाशी क्षेत्र असल्याने वस्तीमधील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शिवाय विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवत असल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे 21 नंबरचा परीक्षा ब्लॉकमध्ये 90 टक्के विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सदर इमारतीत लोकांचा जमाव मोठया प्रमाणात असतो त्यामुळे केंद्रावरील नियुक्त केंद्र संचालक, पर्यवेक्षक इतर नियुक्त अधिकारी हे दहशतीखाली असल्याने कॉपी रोखण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची प्रभावी उपाययोजना घाबरत असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. याकेंद्राबाबत उपविभागीय अधिकारी पांडा यांनी अधिक माहिती घेतली असता हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे.

त्यामुळे सदर केंद्र रद्द करून दुसरे केंद्र नेमल्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात यावा असेही म्हटले आहे. भेटीदरम्यान त्यांच्या पथकाने तसा पंचनामाही केला आहे. पांडा यांनी पोलीस अधिक्षक याचाही बोलतांना पुरेशा पोलीस बंदोबस्त असा गोंधळ होत असून बंदोबस्तात वाढ करण्याची मागणी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com