शहादा - Shahada - ता.प्र :

शहरातील संभाजीनगर वसाहतीत दुपारी चार वाजेच्या सुमारास सार्वजनिक वाचनालयाजवळ अतिउच्च दाबाच्या वीजतारांच्या विद्युत खांबास डंपरने ठोस मारल्याने जमिनीच्या काही अंतरावरच पडल्याने मोठा अनर्थ टळला. तात्काळ विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला.

शहरातील संभाजीनगर भागात पालिकेच्या वतीने विकासकामे सुरु आहेत. सोमवारी दुपारी डंपर (क्रमांक एम.एच.39-सी-0262) हा संभाजी नगरमधून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने सरळ तो अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा असलेल्या खांबावर धडकला.

त्यामुळे विद्युत पोल पुर्ण वाकून तारा खाली आल्या. सुदैवाने यावेळी लगत कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

विज प्रवाह तारा डंपरवर पडली नसल्याने चालकदेखील वाचला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांना कळविले.

उपअभियंता सुजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्युत पुरवठा खंडित करून तात्काळ त्याची माहिती घेत संबंधित ठेकेदाराला नविन पोल आणून स्व:खर्चाने दुरुस्ती करावी, असे आदेश दिले.

संभाजीनगर, विजयनगर, बोहरी कॉलनी वसाहतीच्या या भागांमधून अतिउच्च दाबाच्या तारा गेल्या आहेत. ते विद्युत खांब काढण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली आहे. मात्र, दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

गेल्या पंधरा वर्षापूर्वी याच विद्युत तारांच्या धक्क्याने बोहरी समाजातील एका नागरिकाचे दोन्ही हात निकामी झाले आहेत. याची अधिकार्यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

सुदैवाने विजेचा खांब पडला मात्र अनर्थ टाळला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने तात्काळ लोंबकळणार्या तारा व पोल काढण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.