आतापर्यंत फक्त पुढारीच फेकमफाक करत होते...

चांगली पोस्टींग मिळविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून सत्ताधारी नेत्यांना खुष करण्याचा प्रयत्न : खा.डॉ.गावित
आतापर्यंत फक्त पुढारीच फेकमफाक करत होते...

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हाधिकार्‍यांचा कार्यकाळ आता संपत आला असून त्यांना चांगल्या ठिकाणी पदोन्नती व पोस्टींग मिळावी म्हणून सत्ताधारी पक्षातील नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत फेकमफाक करण्याचे काम फक्त पुढारीच करत होते मात्र आता जिल्हाधिकार्‍यांसारखे वरिष्ठ अधिकारीदेखील फेकमफाक करत असल्याचा आरोप खा.डॉ.हीना गावित यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे केला.

गेल्या महिन्याभरापासून रेमडिसीविर इंजेक्शनच्या मुद्दयावरुन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

दि.३ मे रोजी रात्री ८ वाजता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांनी आपली बाजू मांडली.

त्यावर लागलीच काल दि.४ मे रोजी खा.डॉ.हीना गावित यांनीदेखील ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे पुन्हा एकदा जिल्हाधिकार्‍यांवर आरोप केले. खा.डॉ.गावित म्हणाल्या, आपल्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचा कार्यकाळ पूर्णत्वास येत आहे.

त्यामुळे त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टींग व पदोन्नती मिळावी यासाठी ते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना खूश करत आहेत. मात्र, नेत्यांना खूश करत असतांना जिल्हयातील गोरगरीब जनतेचा जीव घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारीच काय कोणालाही नाही.

जिल्हाधिकारी म्हणतात, रेल्वे कोविड कोच माझ्यामुळे आली मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. ७ एप्रिलला केंद्रातील दोन निरीक्षक नंदुरबारला आले होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. तेथे निरीक्षकांनी रेल्वे कोविड कोचची संकल्पना मांडली.

बैठकीनंतर त्या निरीक्षकाने मला सांगितले, की आपण रेल्वे मंत्र्यांना सांगितले तर हा विषय लवकर मार्गी लागेल. त्यानंतर मी दुसर्‍याच दिवशी रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून माहिती दिली. रेल्वमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पत्र आल्यास लगेच मंजूरी देण्याचे सांगितले.

त्यानंतर निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडून पत्र मिळवून रेल्वेमंत्र्यांना पाठविले. त्यानंतर रेल्वे कोविड कोच मंजूर झाली. मात्र, जिल्हाधिकारी त्याचे श्रेय घेतात. आतापर्यंत फेकमफाक करण्याचे काम पुढारीच करत होते, पण आता जिल्हाधिकार्‍यांसारखे वरिष्ठ अधिकारीदेखील फेकमफाक करत असल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

खा.डॉ.गावित म्हणाल्या, नंदुरबार जिल्हयातील ऑक्सीजन प्लांटची सध्या देशभर हवा झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात माहिती घेतली असता नंदुरबार जिल्हा ऑक्सीजनसाठी परिपूर्ण नाही. मात्र, नंदुरबार जिल्हा ऑक्सीजनमध्ये परिपूर्ण झाला, अशा बातम्या प्रकाशित झाल्या.

याबाबत जिल्हाधिकारी विविध वाहिन्यांना मुलाखती देवून याबाबत माहिती दिली आहे. करोनाची दुसरी लाट येणार आहे, हे जिल्हाधिकार्‍यांना डिसेंबर महिन्यातच कळले होते, असे ते सांगतात. यासाठी त्यांनी ऑक्सीजन प्लांट तयार केले.

मात्र, वस्तुस्थिती अशी आहे, नंदुरबारच्या २०० खाटांच्या महिला रुग्णालयात ऑक्सीजनची सोय नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक व इतर डॉक्टरांनी ऑक्सीजन प्लांटची मागणी केली. म्हणून नोव्हेबरमध्ये पहिला प्लांट पूर्ण झाला.

फेब्रुवारीपासून जिल्हाधिकार्‍यांनी शाळा सुरु ठेवल्या. त्यामुळे कोविडचा स्फोट झाला. ३ मार्चला दुसरा प्लांट मंजूर केला. तो प्लांट ४ एप्रिलला पूर्ण झाला. तिसरा प्लांट शहाद्यात केला. मार्चअखेर मंजूरी दिली. त्या पलांटचे काम १६ एप्रिलला पूर्ण झाले.

२० एप्रिलला तो सुरु झाला. नवापूर आणि तळोदा येथील मंजूरीची तारीख २७ एप्रिल आहे. जिल्हाधिकार्‍यांना डिसेंबरमध्येच माहिती होते तर त्याला एप्रिललमध्ये का मंजूरी दिली. लिक्विड ऑक्सीजनसाठी फक्त खड्डे खोदले आहे.

ते कार्यान्वित होण्यासाठी अजून एक दीड महिला लागणार आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात तर हवेतून ऑक्सीजन घ्यायला सांगतात. धुळे दररोज येथून दोनशे ते तीनशे ऑक्सीजन सिलींडर आजही येतात.

धुळे जिल्हयातील एका अधिकार्‍याने फोन करुन सांगितले, तुमचा जिल्हा ऑक्सीजनने स्वयंपूर्ण आहे मग आता आमच्या जिल्हयातून ऑक्सीजन घेणे बंद करा, असे सांगितले. सुरतहून नवापूरला ऑक्सीजन येते. मात्र, तरीही नंदुरबार जिल्हा ऑक्सीजनने परिपूर्ण असल्याच्या खोटया बातम्या पसरवण्यात आल्या आहेत.

मात्र, ही वस्तुस्थिती आपण समोर आणल्यानंतर आता जिल्हाधिकारी म्हणतात, जिल्हा ऑक्सीजनने स्वयंपूर्ण झाला असे आपण कधीच बोललोच नाही. जर जिल्हा ऑक्सीजनने स्वयंपूर्ण नव्हता तर जिल्हाधिकार्‍यांनी विविध वाहिन्यांना याबाबत माहिती देवून खुलासा करायला हवा होता.

पण त्यांनी तसे केले नाही. ते फक्त मोठया नेत्यांकडून पाठ थोपटून घेण्याचे काम करत आहेत. वास्तविक परिस्थिती मान्य करण्यास हरकत काय आहे? पाझिटीव्ह ऍटीटयुड ठेवला असता जिल्हयात यापेक्षाही चांगली परिस्थिती निर्माण झाली असती, असेही खा.डॉ.गावित यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com