नंदुरबार जिल्हा परिषदेत खदखदणारा असंतोष मिटणार?
नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषदेत खदखदणारा असंतोष मिटणार?

Ramsing Pardeshi

जिल्हा परिषदेत सत्तांतराचे वारे वाहत असतांनाच शिवसेनेला बांधकाम सभापतीपद मिळणार असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून खदखदत असलेला असंतोष मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विद्यमान बांधकाम सभापती तथा विधान परिषदेचे कॉंग्रेसचे उमेदवार असलेले अभिजीत पाटील हे काय भुमिका घेतात? याकडे लक्ष लागून आहे.

राकेश कलाल, नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. ५६ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपा व कॉंग्रेसला समसमान २३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला सात जागा मिळाल्या होत्या. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना सहा जागांची आवश्यकता होती. त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे होत्या. दरम्यान, राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेससोबत जाणे पसंत केले. मात्र, कॉंग्रेसला पाठींबा देण्यापुर्वी शिवसेनेने जि.प.उपाध्यक्ष पदासह बांधकाम सभापतीपदाची मागणी केली होती. ती मागणी पूर्णदेखील झाली होती. परंतू ऐनवळी सभापती निवडीप्रसंगी कॉंग्रेसने घुमजाव केल्याने शिवसेनेला फक्त उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले होते. माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र ऍड.राम रघुवंशी यांच्या गळयात उपाध्यक्षपदाची माळ पडली होती. याशिवाय कृषि व पशुसंवर्धन विभागाचे सभापतीपदही त्यांना देण्यात आले. परंतू बांधकाम सभापतीपद न मिळाल्याने शिवसेना तेव्हापासून नाराज होती. ऍड.रघुवंशी यांच्या दालनाची भिंत फोडल्याचे भांडवल करत राजकारणही करण्यात आले होते. शिवसेना पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले जात नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे सत्तेत अस्तित्व दिसत नसल्याने शिवसेना अस्वस्थ होती. दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहून सत्ताधारी कॉंग्रेसची कोंेडी करण्याचा प्रयत्न केला. या सभांमध्ये असलेले विषय मतदान करुन मंजूर करण्याचा पवित्रा भाजपाने घेतला. त्यामुळे जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी या अडचणीत आल्या होत्या. परंतू तरीही त्यावेळी अधिकाराचा वापर करुन विषय मंजूर करण्यात आले. त्यानंतर शिवसेना कॉंग्रेसला दिलेला पाठींबा काढून घेईल व भाजपाला पाठींबा देवून सत्तांतर घडवून आणेल असे चित्र निर्माण करण्यात आले होते. भाजपा व शिवसेना नेत्यांची याबाबत चर्चाही झाली असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव आणून सत्तांतर घडवले जाईल, असेच चित्र होते. त्यानंतर मात्र, कॉंग्रेसचे नेत्यांनी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी जुळवून घेतल्याचे समजते. त्यामुळेच की काय येत्या ३१ जुलै रोजी होणार्‍या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्याकडे बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी येणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले होते. यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तांतर टळणार आहे. मात्र, विद्यमान जि.प.बांधकाम सभापती अभिजीत पाटील यांच्याकडील बांधकाम सभापती काढून घेतल्यानंतर ते काय भुमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मार्चमध्ये घोषित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अभिजीत पाटील हे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. सदर निवडणूकदेखील येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध भाजपाचे अमरिशभाई पटेल हे तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत अभिजीत पाटील यांच्यासाठी विधान परिषद ही निवडणूक महत्वाची आहे. शिवसेनेशी कॉंग्रेसने जुळवून घेतल्यास त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे अभिजीत पाटील यांना विधान परिषद निवडणुकीत मिळणार आहे. कारण माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे नंदुरबार नगरपालिका आहे. धडगाव नगरपंचायतीतही शिवसेनेचे बरोबरीने नगरसेवक निवडून आले आहेत. नवापूर नगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. शहादा नगरपालिका भाजपाच्या ताब्यात असली तर नगराध्यक्ष मोतीलाल पाटील हे अभिजीत पाटील यांचे वडील आहेत. त्यामुळे शहादा पालिकेचीही साथ त्यांनाच मिळणार आहे. पंचायत समित्यांवरही दोन सभापती कॉंग्रेस, एक सभापतीपद शिवसेनेकडे आहे. याशिवाय माजी आ.रघुवंशी यांचे धुळे जिल्हयातही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. माजी आ.अमरिश पटेल यांच्यामुळे श्री.रघुवंशी यांना दोन वेळा विधान परिषद निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी आहेच. आता श्री.पटेल हे भाजपात आहेत तर श्री.रघुवंशी हे शिवसेनेत आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पक्ष एकमेकांंचे कट्टर विरोधक बनले आहेत. त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे अभिजीत पाटील यांना निवडणुकीत होवू शकतो. त्यामुळे तुर्त अभिजीत पाटील यांच्याकडील बांधकाम सभापतीपद काढले गेले तरीही ते कोणतीही भुमिका घेणार नाहीत, उलट ते त्याचे स्वागतच करतील, असे वाटते. परंतू या तडजोडीमुळे जिल्हा परिषदेतील सत्तांतर टळणार आहे. शिवसेनेलाही हवे ते पद मिळणार आहे आणि अभिजीत पाटील यांचीही आमदारकीची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com