शहादा | ता.प्र.- NANDURBAR

तालुक्यातील विविध भागात शनिवारी पहाटे अवकाळी मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे अनेक भागातील शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शिरुड, ससदे, शेल्टी आदी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतात सकाळपर्यंत गुडघ्याएवढे पाणी साचले होते.

नाले पाण्याने ओसंडून वाहत होते. शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकर्यांना सकाळी शेतीचे बांध फोडून पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. ऊस तोडणी कामगारांच्या रहिवासी झोपडीत पाणी गेल्याने संसारोपयोगी सर्व वस्तू ओल्याचिंब होऊन खराब झाल्या आहेत.

शहादा तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून रिपरिप पाऊस सुरु होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरात धुक्याचे वातावरण असल्याने सूर्याच्या दर्शन क्वचित लाभत होते. काल दुपारी दोन वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली होती.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे पहाटेपर्यंत पावसाने चांगलीच मुसंडी मारल्यामुळे तालुक्यातील विविध भागात पावसाने जोर धरला होता. काही भागात दहा मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

तालुक्यातील शिरुड, ससदे, टेभा या भागात पावसाने चांगला जोर धरल्यामुळे सकाळपर्यंत अनेकांच्या शेतात गुडघ्याखाली जमेल एवढं पाणी साचले होते. नाले पाण्याने ओसंडून वाहत होते. अनेक शेतकर्यांनी शेतातील पाणी बाहेर काढण्याकरिता बांध फोडून पाणी बाहेर काढले आहे.

शेतकर्यांच्या शेतातील गहू पूर्णतः झोपून गेला आहे. त्याने पपई अनेक पिकांना मोठे नुकसान पोहोचलेले आहे. डॉ.पी.बी.पाटील, शरद बाबुलाल पाटील, मगन देवीदास पाटील, ब्रिजलाल तुमडू पाटील, डॉ.रवींद्र दशरथ पाटील, नितीन नथू पाटील अनिल सह शेतकर्यांच्या शेतीच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

त्याचप्रमाणे खाजगी व सहकारी तत्त्वावर चालणार्या साखर कारखान्याच्या ऊसतोडणीकरिता जिल्ह्यातून आलेल्या कामगारांच्या झोपडया खराब झाल्या. रात्रीच्या व पहाटेच्या पावसामुळे ऊसतोड कामगारांची पावसामुळे चांगली तारांबळ उडाली होती.

शेतात टेकड्यांवर सध्या वास्तव असल्याने या पावसामुळे अनेकांच्या कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू व अन्नधान्य पावसामुळे पूर्णता खराब झालेले आहे. कडाक्याची थंडी, त्यात पावसामुळे मजूर कामगारांच्या तब्येतीचा प्रश्न उभा राहिलेला आहे.

ससदे-टेंभा रस्त्यादरम्यान ऊसाच्या टिपर्याने भरला. ट्रॅक्टर रस्त्यालगत पलटी झाला आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. साईडपट्टी नसलेला हा रस्ता तसेच मधोमध असलेले खड्डे हे वाहनचालकांना अपघाताला आमंत्रण ठरु पाहत आहे.

तालुक्यात आज सकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे. शहादा येथे १८ मिलिमीटर, प्रकाशा २८ मिमि, कलसाडी १६, म्हसावद ७, ब्राह्मणपुरी ७, मंदाणे ३, वडाळी ११ तर सारंगखेडा १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शहादा उपविभागीय प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे,तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी सर्कल व तलाठ्यांना शेतकर्यांच्या शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

शहादा-लोणखेडा रस्ता बायपासलगत खड्ड्याची दूरवस्था

शहादा-लोणखेडा बायपास रस्ता शहादा उपविभागीय वन विभाग कार्यालयाला लागून दोंडाईचाकडे जाणारा रस्ता असून या ठिकाणी सुमारे २०० मीटर अंतरापेक्षा जास्त रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने या रस्त्यावरून दररोज पादचारी दुचाकी चारचाकी व जड वाहन यांची दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना रस्ता पार करण्याकरिता जीव मुठीत धरून वाहन बाहेर काढणे अवघड जात असते. काल परवा झालेल्या पावसामुळे या खड्ड्यात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे दुचाकी व लहान चार चाकी वाहन काढणे अवघड गेलेले आहे. दोन-तीन मोटारसायकली वाहनचालक पाण्यात पडल्याने त्यांचे कपडे खराब झाले. रस्ता दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने त्वरित करावे व भविष्यात होणारे किरकोळ किंवा मोठे अपघात टाळण्यासाठी हा रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय मित्तल यांनी केली आहे.