नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हाधिकारी डॉ.राजेंंद्र भारुड यांनी 15 एप्रिलपर्यंत दर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे.

आज शनिवारी नंदुरबारसह जिल्हाभरात या कर्फ्यूला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता.

जिल्हयात करोनाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे. दररोज चारशे ते पाचशे कोरोना रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दि.15 एप्रिलपर्यंत दर शनिवारी सकाळी 6 वाजेपासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार आज शनिवारी सकाळपासूनच सर्व व्यवसाय बंद होते. केवळ औषधी दुकाने, दवाखाने, पेट्रोलपंप यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरु होत्या.

त्यामुळे चौकाचौकात शुकशुकाट होता. बससेवाही बंद असल्यामुळे रस्त्यावर एकही बस धावतांना दिसली नाही. रिक्षाही बंद होत्या. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलीसांनी वाहनधारकांना अडवून कफ्यूची जाणीव करुन दिली. एकुणच जिल्हाभरात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अशा उपाययोजनांची गरज आहे.

नागरिकांनीही या उपाययोजनेचे स्वागत करण्याची गरज आहे. विनाकारण रस्त्यावर न फिरता घरातच बसून कोरोनाविरुद्धची लढाई लढावी. याशिवाय मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शहादा

शहरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाला पायबंद लावण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये मध्यरात्रीपासून दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे सकाळपासूनच पूर्णतःशुकशुकाट जाणवत होता. शहरातील सर्व व्यवहार बंद असून सर्वत्र रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. विनाकारण फिरतांना आढळून आल्यास पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येत आहे. नगरपालिका, पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी सकाळपासूनच रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी पाहणी करत आहेत. विशेष म्हणजे नागरिकांनी या जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.

शहरात विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यात गरीब नवाज कॉलनी, खेतिया रस्ता, जुना प्रकाशा रस्ता तसेच अन्य ठिकाणी पालिका प्रशासनाने बॅरिकेट्स लावले आहेत. शहरात सकाळी 6 वाजेपासूनच पोलीस गाड्या गस्त करीत आहेत. मुख्य रस्त्यांवर ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील मुख्य वर्दळ असलेल्या पुरुषोत्तम मार्केट, काशिनाथ मार्केट, चार रस्ता, मेन रोड, खेतिया रस्ता, भाजी मार्केट, बसस्थानक आवारात कमालीचा शुकशुकाट होता. जनता चौक, चार रस्ता, पाण्याची टाकी, खेतीया रस्ता, डोंगरगाव रस्ता, तूपबाजार, गरीब नवाज कॉलनी मेमन कॉलनी डोंगरगाव रस्त्यावर बॅरिकेट्स लावून प्रमुख रस्ते बंद केले आहेत. सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात केलेला आहे. ग्रामीण भागातील कोणतेही वाहन शहरात दाखल होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापार बंद आहेत.

प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी,,पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी,,स्वच्छता निरीक्षक आर.एम.चव्हाण, नगरपालिका अभियंता संदीप टेंभेकर, मंडळ निरीक्षक पी.बी.अमृतकर यांच्यासह अधिकार्यांनी मुख्य रस्त्यांवर गस्त घातली. शहरातील वाढती रुग्णांची संख्या बघता रुग्णवाहिकादेखील कमी पडल्या आहेत..एकंदरीत शहरात पूर्णतः व्यवहार ठप्प असून शुकशुकाट आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी अगोदरच आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यात दर शनिवारी, रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. असे असतानादेखील विनाकारण शहरात दुचाकी मोटरसायकलने फिरणार्या वाहनचालकांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. रविवारी रस्त्यावर कोणीही विनाकारण फिरकू नये अन्यथा कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नवापूर

नवापूर शहरात कोविड-19 चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी जिल्हयात शनिवारी व रविवारी जनता कर्फु लागू केला आहे. आज शनिवारी नवापूरकरांनी जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद दिला.

नवापूर शहरात सकाळपासून तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मुख्याधिकारी महेश चौधरी शहरात फेरफटका मारतांना दिसून येत होते. शहराच्या मुख्य रस्त्यावर नवापूर नगरपालिकेने बॅरेकेटींग केली असून चौका चौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहरात चार चाकी, टुव्हिलर गाड्यांचा चालकांची विचारपूस करुन शहरात एंट्री देत असतांनाचे चित्र दिसत होते. तसेच नवापूर शहरातील जनता पार्क, गुजरगल्ली, सरदार चौक भागात नागरीकांची कोविड टेस्ट करत असुन यामध्ये नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे.जनता पार्क, गुजरगल्ली भागात नगरसेविका अरुणा पाटील तसेच नगरसेविका बबीता वसावे यांनी त्यांचा प्रभाग 2 मध्ये फिरुन नागरीकांना कोविड-19 टेस्ट करण्याची विनंती केली. त्याला नागरीक प्रतिसाद देत आहे. यावेळी तहलीलदार मंदार कुलकर्णी, नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश चौधरी, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कुंभार आदी उपस्थित होते.

तळोदा

तळोदा आणि परिसरात आज कडकडीत संचारबंदी पाळण्यात आली. त्यामुळे परिसर निर्मनुष्य झाला होता.

तळोदा येथील नेहमी गजबजलेला व रहदारीचे ठिकाण असलेले मुख्य बाजापेठ, स्मारक चौक, सराफा बाजार, भाजी मंडी, चिनोदा चौफुली, कॉलेज रोड, बिरसा मुंडा चौक, शहादा रोड बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. मोती बँक ते काकशेठ गल्ली पावेतो रस्ते निर्मनुष्य दिसत होते. सर्व व्यवहार बंद होते. नागरिकांनीही घरातच बसणे पसंद केले. रस्त्यांवर फक्त पोलिसांच्या गाडया फिरताना दिसत होत्या. ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. रस्त्याने जाणार्या व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती. ग्रामीण भागात ही जनता संचारबंदीला पूर्णपणे सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.

धडगाव

जिल्हयात शनिवारी व रविवारी जिल्ह्यात दोन दिवसांच्या जनता कर्फ्युचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करत धडगाव शहरात सकाळपासून पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला. सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. धडगाव शहरातील पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाने जनता कर्फ्युची वारंवार पाहणी करत जनतेला विनाकारण बाहेर न पडण्याचा सूचना दिल्या आहेत.