आठ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठेत उसळली गर्दी
नंदुरबार

आठ दिवसांच्या लॉकडाऊननंतर बाजारपेठेत उसळली गर्दी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

Nandurbar - Shahada - शहादा - ता.प्र :

शहरात आठ दिवसाचा लॉकडाऊन संपल्याने नागरिकांची बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुख्य बाजारपेठ त्यामुळे गजबजून गेली होती. किराणा दुकानावर व भाजीपाला घेण्यासाठी गर्दी झाली होती. त्यातच 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने आणि रविवारी पुन्हा कर्फ्यू असल्याने महिलांनी राख्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

कोरोनामुळे गेल्या चार महिन्यापासून सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सण-उत्सव धार्मिक कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. जिल्हा प्रशासनही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासन कठोर निर्णयदेखील घेत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशानाने दि.22 ते 30 जुलैदरम्यान लॉकडाऊन जाहीर केले होते.

शहरातही आठ दिवसाचा लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आज लॉकडाऊन संपल्यानंतर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. तसेच अनेक जण विना मास्क फिरताना दिसून आले. शहरातील दोंडाईचा रोड, मेन रोड व मुख्य बाजारपेठेत किराणा मालासह विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

जागोजागी भाजीपाला व फळे घेण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती. विशेषतः 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने राखी घेण्यासाठी महिला वर्गाने राखी विक्रेत्यांच्या दुकानावर गर्दी केली होती. कारण 2 ऑगस्ट रोजी रविवारी पुन्हा कर्फ्यू असल्याने बाजारपेठ बंद राहणार आहे. त्यामुळे आज लॉकडाऊननंतर गर्दी झाली होती. उद्या शनिवारीदेखील बाजारपेठ गजबजलेली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला अधिक सतर्क रहावे लागणार आहे.

पोस्टऑफिस व कुरिअरला फटका

कोरोनाचा फटका पोस्ट ऑफिसलाही बसला आहे. कारण पोस्टाची पार्सल वाहून नेणारी लाल परी अर्थात एसटीदेखील बंद असल्याने पोस्टाने दरवर्षाप्रमाणे यंदा राखीसाठी पाकिटे मागवले नाहीत. त्याचा आर्थिक फटका या विभागाला बसला असून कुरिअर सेवाही ठप्प झाली आहे.

त्यामुळे महिलांवर्गाचाही हिरमोड झाला आहे. तरीदेखील महिलानी राख्या खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे शहादा शहरात आठ दिवसाच्या लॉकडाऊन नंतर बाजारपेठ पुन्हा गजबजलेली दिसून आली.

Deshdoot
www.deshdoot.com