सारंगखेड्यात करोनाचा शिरकाव
नंदुरबार

सारंगखेड्यात करोनाचा शिरकाव

२५ जणांना केले होम क्वॉरंटाइन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

Nandurbar - सारंगखेडा - वार्ताहर :

येथील खाजगी डॉक्टरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळताच गावात सन्नाटा पसरला आहे. गावातील ज्यांचा संपर्क त्या बधितांशी आला होता, त्यांच्यात घबराट पसरली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत असून गावात तीन दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कातील दोन जणांचे स्वॅब घेण्यात आले असून 25 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पाच महिन्यापासून गावात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. ग्रामस्थ आपापली कामे करून घरी विश्रांती घेत होते. तोच रात्री उशिरा भ्रमणध्वनीवरून सारंगखेडा (ता.शहादा) येथील खाजगी डॉक्टर पॉझिटीव्ह असल्याची बातमी कर्णोपकर्णी गावात पसरली. डॉक्टरांकडे उपचारासाठी कोण गेले होते. उपचार करणारा रुग्ण कोणत्या औषधी दुकानातून औषध आणण्यासाठी गेले होते, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. खाजगी डॉक्टरांकडे एक रुग्ण आला, तो संशयीत आढळल्याने त्याला उपचारासाठी शहादा येथे पाठविले. शहादा येथील खाजगी रुणालयातील डॉक्टरांनी स्वॅब घेण्याचा सल्ला दिला. त्या रुग्णाचे स्वॅब घेऊन विलगीकरण करण्यात आले आहे. ही माहिती सारंगखेडा येथील खाजगी डॉक्टरांना कळल्यावर त्यांना आपल्या कुटुंबासह इंदोर येथील खासगी रुणालयात दाखल होऊन स्वॅब दिले असता डॉक्टरांसह पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला.

उपाययोजना करुनही करोनाचा शिरकाव

गाव कोरोनामुक्त रहावे म्हणून गेल्या पाच महिन्यात विविध उपाययोजना केल्या जात होत्या. ग्रामपंचायतीमार्फत गावात सॅनिटाईज केले जात होते. गावातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या औषधीची वाटप घरोघरी केली होती. बाहेरून आलेल्या व्यक्तीची चौकशी करूनच गावात प्रवेश केला जात होता. आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले जात होते. तरीही गावात कोरोनाने शिरकाव केला.

डॉक्टरांचा संपर्कातील रुग्णांचा शोध

डॉक्टारांशी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी, औषधी दुकानदारांनीही संपर्कात असतील त्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे . डॉक्टरांचा कुटुंबातील दोन जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत तर उर्वरित 25 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तीन दिवस लॉकडाऊन

गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात तीन दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. बाजारपेठेतील गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. खाजगी दवाखाना व औषधी दुकानेही बंद ठेवण्यात आले आहेत. गावात फवारणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, पोलीस निरिक्षक चंद्रकात सरोदे, आरोग्य कर्मचारी सी.एम.पाटील, ग्रामसेवक संजय मंडळे यांनी पाहणी केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com