प्रकाशा येथे तापी पात्रात वाहून जाणार्‍या एका भावाला वाचविण्यात यश : दुसरा बेपत्ता

प्रकाशा येथे तापी पात्रात वाहून जाणार्‍या
एका भावाला वाचविण्यात यश : दुसरा बेपत्ता

प्रकाशा Prakasha । वार्ताहर

प्रकाशा येथील तापीनदी पात्रात (Tapi River basin) दोघे भाऊ (Two brothers) अंघोळीला गेले असतांना एक जण वाहून गेला (Carried away) तर दुसर्‍याला वाचविण्यात नावाडयांना यश आले. या घटनेमुळे प्रकाशा येथील सिद्धार्थनगरात शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाशा ता.शहादा येथील सिध्दार्थनगरमध्ये राहणारे नरेंद्र भिमा सामुद्रे यांच्या वडीलांचे चार दिवसांपुर्वी निधन झाले. त्यामुळे ते परिवारासह पुजाविधी व मुंडनाच्या कार्यक्रमासाठी प्रकाशा येथील घाटावर आले होते. कार्यक्रम सुरु असतांना त्यांची दोघे मुले राज सामुद्रे व गौतम सामुद्रे हे आंघोळीसाठी तापी नदीच्या पात्रात उतरत असतांना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

पाण्याच्या प्रवाहासोबत राज नरेंद्र सामुद्रे (वय 16) हा वाहून गेला तर गौतम सामुद्रे हा पाण्यात वाहत असतांना त्याला नावाडी रमेश सना ठाकरे व जयसिंग ठाकरे यांनी काही अंतरावर जावून पकडले. त्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले आहे.

गौतम यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. राज नरेंद्र सामुद्रे हा पुराचा पाण्यात वाहून गेला. त्याला शोधण्यासाठी दिवसभर शोधमोहीम सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच प्रकाशा येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे सिध्दार्थनगर शोककळा पसरली आहे. गेल्या आठवडयापासून तापी नदीच्या उगम क्षेत्रात दमदार पाऊस होत असून हातनूर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यातच प्रकाशा बॅरेजवरील दरवाजे उघडल्याने पाणीसाठा वाढला आहे.

रात्री उशिरापर्यंत राज सामुद्रे याचा शोध घेण्याचे कार्य युध्दपातळीवा सुरू होते. तापी नदीच्या काठावर कोणीही जावू नये, असे आवाहन शहादा पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले. प्रकाशा येथील पोलीस हवालदार सुनिल पाडवी, अलिम मन्यार घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com