...पण अर्ध्यावरती डाव मोडला

उपचारासाठी बायकोला खांद्यावर घेऊन नवर्‍याची पायपीट
...पण अर्ध्यावरती डाव मोडला

नंदुरबार । Nandurbar

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील चांदसैली घाटात Chandsali Ghat दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. त्याचवेळी एका आजारी महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही. दरम्यान, यावेळी पतीने आजारी पत्नीला आपल्या खांद्यावर बसवून घाटातून पायपीट सुरू केली. मात्र, पत्नीने घाटातच पतीच्या खांद्यावर अखेरचा श्वास घेतल्याची हृदयद्रावक घटना 8 सप्टेंबर रोजी घडली.

जिल्ह्यातील सातपुड्यात असलेल्या धडगाव तालुक्यातील चांदसैली येथे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे घाटातील रस्ता बंद झाला. परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी मार्ग नव्हता. केवळ पायी जाणे शक्य होते. दरम्यान, अक्राणी तालुक्यातील पिपलाकुवा येथील सिंदलीबाई पाडवी ही महिला आजारी पडली. पहाटे 5 च्या सुमारास तिच्या पोटात दुखत असल्याने नातेवाईक तिला उपचारासाठी घेऊन जात होते. मात्र, जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेवटी पतीने त्यांना आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली. मात्र, घाटातच या महिलेने पतीच्या खांद्यावर अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच भागाचे प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी करत आहेत.

घाटात दरवर्षी दरडी कोसळतात. त्यामुळे रस्ता बंद पडतो आणि हजारो आदिवासी बांधवांचा त्रास वाढतो. घाट रस्त्यांबाबत होणार्‍या अपघातात केंद्रीय मानवाधिकार आयोगानेदेखील दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे. या भागात 132 केव्ही विद्युत लाईट जात असल्याने सदर घाटात ब्लास्टिंगचे काम करण्यात येते. त्यामुळे दरडी कोसळत असल्यामुळे रस्ता बंद पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सातपुड्यातील मरण यातना कधी संपतील? असा सवाल यानिमित्ताने पुन्हा उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाची सारवा-सारव

चांदसैली जवळील पिपलाकुवा येथील महिला सिबलीबाई पाडवी यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असून दरडीखाली सापडल्याने झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. अक्राणी तालुक्यातील पिपलाकुवा येथील सदर महिलेला तिच्या कुटुंबीयांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील अधिपरिचारिकेने रुग्णास तपासले असता रुग्णालयात येण्यापूर्वीच महिला मृत झाल्याची खात्री अधिपरिचारिकेची झाली. रुग्णास मृत अवस्थेत आणल्याने पोलिसांना कळवून पुढील कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी केस पेपर काढावा, अशी सूचना अधिपरिचारिकांनी केली. त्यावर ती व्यक्ती सदर महिलेस मोटारसायकलवर घेऊन गेली. याबाबत तळोदा पोलीस स्टेशनला कल्पना देण्यात आली. मृत महिलेची प्रकृती मंगळवारपासून ढासाळलेली होती, असे महिलेसोबत आलेल्या व्यक्तीने सांगितले. नागरिकांनी घटनेबाबत कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com