नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागतेय भटकंती, युवकांतर्फे रक्तदानाची चळवळ
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सद्यस्थितीमध्ये एकही रक्ताची पिशवी उपलब्ध नसल्याने रक्तासाठी अनेक गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होत आहे. रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णाचा जीव जाण्याची...

भीती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अनेकांना खासगी रक्तपेढीतून रक्त आणावे लागत आहे. रक्तपेढीतील कर्मचार्‍यांना याचे काही सोयरसूतक नाही. रक्त पाहीजे असल्यास गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना डोनर आणा व पिशवी घेऊन जा, अशी उत्तरे मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीच्या माध्यमातून जिल्हाभरातील गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात येतो. खासगी रक्तपेढ्यांमध्ये सुमारे 1200 ते 1500 रुपयांना रक्ताची पिशवी मिळत असल्याने हलाखीची परिस्थिती असणार्‍या अनेकांना विकतचे रक्त घेणे परवडणारे नसतांना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत खासगी रुग्णालयातील दाखल असणारे तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल असणार्‍या रुग्णांचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी आले असता रक्त उपलब्ध नसल्याने अनेकांना रक्तासाठी वणवण करावी लागत आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत काल दि.4 नोव्हेंबर रोजी कोणत्याही रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नव्हती. तर काल अनेक गरजू रुग्णांचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी रक्तपेढीत आले होते. यावेळी रक्तपेढीतील कर्मचार्‍यांकडून डोनर घेऊन या व पिशवी घेऊन जा, असे सांगण्यात आले.

बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना खरे तर रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरु असतांना दुसर्‍या बाजूला मात्र डोनर उपलब्ध होणार कसा? असा प्रश्न पडतो. यामुळे अनेकजण खासगी रक्तपेढीतून पैसे खर्च करुन रक्त आणून रुग्णाचा जीव वाचविण्याची धडपड करतांना दिसून येत आहेत.

रक्तदानासाठी प्रशासनाचे प्रयत्न आवश्यक

नंदुरबार व शहादा असे दोन ठिकाणी खासगी रक्तपेढ्या आहेत. या ठिकाणी बर्‍याचदा रक्त उपलब्ध होते. येथील कर्मचारी स्वत: गावोगावी फिरुन रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन करतात. यामुळे साहजिकच खासगी रक्तपेढ्यांमध्ये बर्‍याचदा रक्त उपलब्ध होते. मात्र जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील कर्मचार्‍यांकडून मात्र तसा प्रयत्न होतांना दिसून येत नाही किंवा झालाच तर त्यामध्ये सातत्य दिसून येत नाही. परिणामी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत एकही रक्त पिशवी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

युवकांतर्फे रक्तदानाची चळवळ

नंदुरबार जिल्ह्यात काही युवकांनी रक्तदानाची चळवळच सुरु केली आहे. यासाठी सोशल मिडीयाच्या व्हॉटसपवर विविध रक्तगटाच्या रक्तदात्यांचा ग्रुप बनविण्यात आला आहे. यावर गरजू रुग्णांना रक्त पाहीजे असल्यास ग्रुपमधील एखाद्या सदस्याशी संपर्क साधल्यावर अनेकजण स्वयंस्फुर्तीने रक्तपेढीत रक्तदानासाठी जातात.जिल्हा रक्तपेढीतील कर्मचारी केवळ सोशल मिडीयावरच आवाहन करत असल्याचे चित्र आहे. यामुळे बर्‍याचदा रक्तदाते उपलब्ध होतीलच असे नाही. यामुळे नुसतेच सोशल मिडीयावर अवलंबून न राहता जिल्हा रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदानासाठी आवाहन करणे व शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com