आंदोलन करण्यापुर्वीच भाजपा जिल्हाध्यक्षांना अटक करतांना पोलीस
आंदोलन करण्यापुर्वीच भाजपा जिल्हाध्यक्षांना अटक करतांना पोलीस
नंदुरबार

दुधाला अनुदान मिळण्यासाठी भाजपाचे आंदोलन

जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना अटक केल्याने तणाव

Rakesh kalal

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

गायीच्या दूधाला सरसकट १० रुपये प्रती लिटर अनुदान मिळावे व दुधाच्या पावडला प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्याची मागणी करुनदेखील शासनाने दूध उत्पादक शेतकर्‍यांची मागणी मान्य न केल्याने आज भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाभर रास्तारोको आंदोलन करण्यात येवून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, नंदुरबारात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना आंदोलन करण्यापुर्वीच अटक करण्यात आल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वार्‍यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही.राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले होते.

आता तर दुधाचे दर त्यावेळीपेक्षाही खालावले आहेत. मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांनाही वार्‍यावर सोडून दिले आहे. या संकटाच्या काळात दुधाचे भाव अत्यंत कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लीटर गायीचे दूध उत्पादीत होते. त्यापैकी ३५ लाख लीटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दुध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते.

९० लाख लिटर दूध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लीटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल व ग्राहक यांना पुरवितो. मात्र शासकीय योजनेव्दारे केवळ १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये ३० टक्के पर्यंत घट झाली आहे. हरातील हॉटेल्स चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. सहकारी संघाकडून दूध १५ ते १६ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुध्दा निघु शकत नाही.

शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रती लिटर या नावाने घोषणा केली होती. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे.त्याला राज्यातील सरकार जबाबदार आहे.

महायुती सरकारच्या घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍याच्या गायीच्या दुधाला सरसकट प्रती लीटर १० रु अनुदान द्यावे व दूध पावडर निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान द्यावे. दूध खरेदीचे दर प्रती लिटर ३० रुपये करुन दूध उत्पादक शेतकर्‍यांना कोरोना माहामारीत जगण्याचा आधार द्यावा. याबाबत शासन योग्य निर्णय घेत नसल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे आज जिल्हभर आंदोलन करुन निषेध करण्यात आला.

दरम्यान, आज दुधाच्या अनुदानासंदर्भात आंदोलन करण्यात येणार असल्याने नंदुरबार येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते याठिकाणी आंदोलनासाठी एकत्र आले होते.

परंतू आंदोलन करण्यापुर्वीच पोलीसांनी चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीसांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्याशी भाजपा कार्यालयात चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, चौधरी यांनी आम्ही सनदशिर मार्गाने आंदोलन करत आहोत. शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन आंदोलन करणार आहोत, असे सांगितले.

परंतू पोलीस प्रशासनाने काहीही न ऐकता श्री.चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजेंद्रकुमार गावित, निलेश माळी, सदानंद रघुवंशी, पंकज पाठक, कमल ठाकूर, सविता जायस्वाल, संगिता सोनवणे आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या व दूध उत्पादकांच्या प्रश्नांविषयी आंदोलन करण्यात येत असतांना सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करीत आहेत. पोलिसांनी आमचे आंदोलन कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी शेतकर्‍यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करु. कोरोना महामारीच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी अत्यंत दुःखी आहेत असे असताना त्यांच्या अडचणींवर मात करण्याऐवजी सरकार पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेे, त्याचा आम्ही निषेध करतो.

-विजय चौधरी जिल्हाध्यक्ष,भाजप

Deshdoot
www.deshdoot.com