भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला कारसेवकांचा सन्मान

राममंदिराच्या भव्य मंदिराची रांगोळीतून साकारली प्रतिकृती
अयोध्येतील कारसेवकांचा सन्मान करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी तसेच रांगोळीतून साकारण्यात आलेली श्रीराम मंदिराची प्रतिकूती.
अयोध्येतील कारसेवकांचा सन्मान करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी तसेच रांगोळीतून साकारण्यात आलेली श्रीराम मंदिराची प्रतिकूती.

नंदुरबार | प्रतिनिधी - Nandurbar

अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर व्हावे ही देशवासीयांची इच्छा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केली असून आज अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणाचा शुभारंभ झाल्याने हा दिवस ऐतिहासिक व अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात कारसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाने केले होते.

कार सेवकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना विजय चौधरी पुढे म्हणाले राम मंदिर निर्माणाची लढाईही प्रदीर्घ चालली. मोदी सरकारच्या काळात निपक्षपाती न्यायालयीन प्रक्रिया गतिशील झाल्याने अयोध्येत प्रभू रामचंद्रांचेच मंदिर होते, हे सिद्ध झाले. त्यामुळे मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होऊ शकला.

मंदिर वही बनायेंगे अशा गगनभेदी घोषणा देत अयोध्येत राम मंदिर निर्मितीकरिता भारतीय जनता पार्टीने सातत्याने प्रयत्न केलेत. अनेक कार सेवकांचे योगदान देखील लाख मोलाचे आहे. अनेकांना या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देखील द्यावी लागली याचे स्मरण करुन कारसेवकांना नमन आणि वंदन केले.

याप्रसंगी अयोध्या येथे जाणार्‍या कार सेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यात राजेंद्र माळी, विजय कासार, रवी कुलकर्णी, बारकू माळी, रवींद्र बोडस, अण्णा माळी, रमेश मिस्तरी, मुकेश माळी यांचा समावेश आहे.

याप्रसंगी भाजपा जिल्हा कार्यालयात प्रभू रामचंद्रांच्या भव्य प्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयाला विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले. तसेच अयोध्येत असलेल्या मंदिराची प्रतिकृती असलेली भव्य रांगोळी महिला मोर्चा पदाधिकारी डॉ. सपना अग्रवाल, संगीता सोनवणे, योगिता बडगुजर यांनी साकारली.

याप्रसंगी भाजपा कार्यालयात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, अश्विन सोनार, पंकज पाठक, कैलास चौधरी, सुदाम पटेल आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com