स्वराज्यध्वज पूजन मोहिमेची याहमोगी मातेच्या चरणी हजेरी

सहा राज्यांतील १२ हजार कि.मी सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास करत दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर होणार प्रतिष्ठापना
स्वराज्यध्वज पूजन मोहिमेची याहमोगी मातेच्या चरणी हजेरी

नंदुरबार | प्रतिनिधी - nandurbar

कर्जत-जामखेड राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतुन शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेचा वारसा सांगणारी स्वराज्य ध्वज (Swarajya flag) मोहिमेअंतर्गत ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास करत दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर दि.१५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहेे. स्वराज्यध्वज पूजन मोहिमे आदिवासी समाजाचे आराध्य देवस्थान असलेल्या याहमोगी मातेच्या मंदिरात पुजा अर्चा करण्यात आली.

शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेचा वारसा सांगणारी स्वराज्य ध्वज मोहिम रविवार दि.१२ सप्टेंबर रोजी सकाळी (Nandurbar) नंदूरबार येथे पोहोचली. कर्जत- जामखेड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आणि आ.रोहित पवार यांची संकल्पना आहे.स्वराज्य ध्वज प्रवासाचा शुभारंभ (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील (Karjat) कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरातून गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी झाला होता. त्यावेळी आ.रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले होते.

नंदूरबारच्या सीमेलगत गुजरातच्या बाजूने सातपुडा पर्वतराजीत अत्यंत निसर्गरम्य परिसरात श्री.याहमोगी माता विसावलेली आहे. इथल्या सुलबारी टेकडीवर आदिवासी समाजाचे अत्यंत जागृत व आराध्य देवस्थान असलेल्या याहमोगी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात देवीचे दर्शन व आशिर्वाद घेतल्यानंतर ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यावेळी नंदुरबार राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, जिल्हाउपाध्यक्ष भीमसिंग पाडवी, जितेंद्र कोकणी, प्रमोदकुमार वसावे, बाळासाहेब मोरे, प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी लोकसहभागातून परंतु कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून हि ध्वज मोहिम एकूण ३७ दिवस संपन्न होणार आहे असल्याची माहिती आ.रोहित पवार यांनी दिली आहे. जगातील सर्वात उंच ध्वज फडकवण्याचा संकल्प पवार यांनी केला आहे.

मानवतेचे आणि भक्ती-शक्तीचे प्रतिक असणारा हा स्वराज्य ध्वज सर्वच जाती-धर्माच्या लोकांसाठी स्फूर्तीदायी आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एक अभिमान वीरपताका म्हणून भगव्या ध्वजाचं महत्त्व उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली संपन्न व अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि.६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६ बाय ६४ फूट असून वजन ९० किलो आहे. तर ध्वजस्तंभाची उंची देखील ७४ मीटर असून तो ९० टन वजनाचा आहे.

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर दि.१५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम, राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात

अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com