नंदुरबार जिल्ह्यात गणरायाचे आगमन

नंदुरबार जिल्ह्यात गणरायाचे आगमन

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी भाविकांचे बाप्पांना साकडे, नियमांचे पालन करण्याच्या प्रशासनाच्या सुचना

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज गणरायाचे ( Ganarayya) उत्साहात स्वागत ( Welcome) करण्यात आले. परंतू यंदा कोरोनाच्या महामारीमुळे ढोलताशांच्या गजराशिवाय गणरायाची स्थापना करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच विना ढोलताशांच्या (Without dholatasha) गजरात तसेच गुलालाची उधळण न करता गणरायाची स्थापना करण्यात आली. नंदुरबार जिल्हयासह राज्य व देशावरील कोरोनाचे विघ्न दूर व्हावे यासाठी गणपती बाप्पांना साकडे घालण्यात आले.

नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच वाजागाजा न करता गणेशाची प्रतिस्थापना झाली. धुळे रस्त्यावरील सर्व गणेश स्टॉल विक्रेत्यांच्या मूर्तींची विक्री झाली. मात्र कोपर्‍यात असलेल्या गणेशमूर्ती कारखानदारांच्या अनेक मूर्ती ग्राहकांअभावी तशाच पडून राहिल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. मानाचा श्री दादा गणपतीची रथात प्रतिस्थापना करण्यात आली. कोरोना महामारीचा गणेशमूर्तिकारांना पन्नास लाखांचा फटका बसला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला परवानगी नाकारण्यात आल्याने यंदा मिरवणुकीची धामधूम दिसली नाही. केवळ धुळे रस्त्यावर असलेल्या गणेशमूर्तींच्या स्टॉलवर गर्दी दिसली. दुपारी दोन वाजता पावसाची रिपरिप सुरू झाल्याने गणेशभक्तांनी भरपावसात गणेशाची मूर्ती खरेदी केली.

या भागात तीसहून अधिक गणेशमूर्तींचे स्टॉल विक्रीसाठी उभारण्यात आले होते. शहरातील गणेशभक्तांनी या भागातून गणेशमूर्ती खरेदी केल्याने स्टॉल विक्रेत्यांमध्ये समाधान दिसले. मात्र गणेशमूर्तींच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मूर्ती विक्रीअभावी पडून राहिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हा कटू अनुभव गणेश मूर्तिकारांना आला. मोठ्या मूर्तींना मूर्तिकारांनी रंगच दिलेला नव्हता. तसेच बाहेर गावातील मागणीही यंदा कमीच दिसल्याने अनेक मूर्तिकारांना फटका बसला आहे.

नारायण वाघ म्हणाले, यंदा राज्य शासनाने मूर्तींच्या उंचीलाच मर्यादा घातल्या होत्या.तसेच रेल्वेगाड्यांची सेवा बंद झाल्याने गुजरातच्या ग्राहकांनी मूर्ती खरेदीकडेच पाठ फिरवली. ई-पास शिवाय वाहतुकीला परवानगी नसल्याने मध्य प्रदेशातही कमीच मूर्ती रवाना झाल्या. यंदा छोट्या मूर्तींना मागणी होती.

त्यामुळे स्टॉलवाल्यांना फायदा झाला.मोठ्या मूर्ती पडून राहिल्याने या मूर्तींसाठी गणेशमूर्ती कारखानदारांना वर्षभर जागेचे भाडे द्यावे लागणार आहे. यंदा मूर्तिकारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काहींचा खर्चही निघाला नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, जिल्हाभरातही आज ठिकठिकाणी साध्या पद्धतीने गणरायाची स्थापना करण्यात आली. कोरोनाचा प्रभाव यंदाच्या गणेशोत्सवावर दिसून आला. गणेशभक्तांनीही मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत व नियमाचे पालन करीत गणरायाचे स्वागत केल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com