नंदुरबारला सशस्त्र दरोडा

१२ लाखाची रोकड लंपास, नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशत
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

येथील गणपती मंदीर परिसरातील डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तेथील कर्मचाऱ्याला बांधून ठेवत 12 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली. घटना कशी व कुठे घडली बघूया...

सकाळच्या वेळी गजबजलेल्या वस्तीत दरोडा पडल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याशिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.

नंदुरबारातील बांधकाम व्यावसायिक देवेद्र जैन यांचे गणपती मंदीरामागील भागात मुख्य रस्त्यावर डी.सी. डेव्हलपर्स हे कार्यालय आहे. या ठिकाणाहून त्यांचे आर्थिक व्यवहार चालतात. आज दि.१९ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत तेथील कर्मचाऱ्याला बांधून ठेवले. तसेच कार्यालयातील 10 ते 12 लाखाची रक्कम घेऊन दोघांनी तेथून पोबारा केला. बांधलेल्या कर्मचाऱ्याने कशीबशी सुटका करून आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली.

यावेळी तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक महेद्र पंडित, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक किशोर नवले, शहर पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मागील बाजुच्या रस्त्यापर्यंत माग दाखवला. पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. याशिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही असा प्रयत्न झाल्याचे समजते. दरम्यान, सकाळी सकाळी शहरातील गजबजलेल्या भरवस्तीत सशस्त्र दरोडा पडल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com