अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा प्रशासनातर्फे सत्कार

चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार-डॉ.राजेंद्र भारुड
अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा प्रशासनातर्फे सत्कार

नंदुरबार । प्रतिनिधी- Nandurbar

अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांनी कोरोना संकटाच्या काळात स्वत: बोटीने प्रवास करून दुर्गम भागात सेवा दिल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले.

रेलूताईंच्या कार्याचे देशभरात कौतुक होत असताना त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, कृष्णा राठोड, रेलूताईंचे पती रमेश वसावे, अंगणवाडी मदतनीस सोनीबाई वसावे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भारुड यांनी साडीचोळी, अभिनंदनपत्र आणि मिठाई देऊन रेलूताईंचा सत्कार केला. त्यांना प्रोत्साहन देणारे पती रमेश वसावे, मदतनीस सोनीबाई यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या मुलींनादेखील जिल्हाधिकार्‍यांनी भेटवस्तू दिली. श्री.गावडे यांनीदेखील भेटवस्तू देऊन रेलूताईंचा सत्कार केला.

यावेळी बोलताना डॉ.भारुड म्हणाले, कोरोना संकटाच्या काळातही रेलूताईंनी कर्तव्यनिष्ठा कमी होऊ दिली नाही. त्यांनी आपल्या कार्याने राज्य आणि देशासमोर अनोखे उदाहरण प्रस्तूत केले. त्यांच्या कामगिरीचा गौरव आणि प्रोत्साहन म्हणून चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. रेलूताई अंगणवाडी घराप्रमाणे जपतील आणि त्या परिसरात भविष्यातदेखील एकही बालक कुपोषित रहाणार नाही याची दक्षता घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासाठी रेलूताईंना बोलवावे असेही ते म्हणाले.

श्री.गावडे म्हणाले, रेलूताईंच्या कामगिरीने इतर भगिनींना चांगल्या कामाची प्रेरणा मिळेल. चिमलखेडीसारख्या भागात एकही कुपोषित बालक नाही ही कौतुकाची बाब आहे. त्यांच्या कार्याचा प्रत्येकाला अभिमान आहे. चिमलखेडी अंगणवाडीला आवश्यक सुविधा देण्यात येतील.

जिल्हा प्रशासनाने कौतुक केल्याने प्रोत्साहन मिळाल्याचे रेलूताईंनी यावेळी सांगितले. सात पाड्यांवर आहार पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

दुर्गम भागात सेवेचा आदर्श

चिमलखेडी येथील 27 वर्षाच्या रेलू वसावे यांनी आपल्या कार्यातून धैर्य आणि क्षमतेचा परिचय दिला आहे. कोरोना संकटातही मासेमारी करण्याच्या बोटीने नर्मदेच्या पात्रातून प्रवास करीत त्यांनी परिसरातील गोराडी, वलनी, दाबाड, कामा, अलिघाट, पिरेबारा आणि पाटीलपाडा या 7 पाड्यांवर राहणारी बालके आणि गरोदर मातांपर्यंत पौष्टीक आहार पोहोचविला. बालकांचे वजन तपासणे आणि मातांना आरोग्यासंबंधी माहिती देण्याचे कार्यदेखील त्यांनी सुरूच ठेवले.

माता आणि बालक कोरोनामुळे अंगणवाडी केंद्रात येणे बंद झाल्यावर स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय रेलू यांनी घेतला. त्यांना पूर्वी अंगणवाडी केंद्रातूनच आहार देण्यात येत असे. रेलू यांना पोहणे आणि बोट चालविणे येते. काहीवेळा एकट्याने आणि काहीवेळा आपल्या नातेवाईक संगिता यांच्यासमवेत त्यांनी बोटीने प्रवास केला आहे.

रेलू यांना दोन लहान मुली आहेत. असे असताना सकाळी लवकर घरातून बाहेर पडत दुपारी 12 वाजेपर्यंत त्या अंगणवाडी केंद्राचे काम पाहतात. त्यानंतर त्या बोटीने परिसरातील पाड्यापर्यंत पोहोचतात. एका पाड्यावर आठवड्यातून दोनदा भेट देतात. गेल्या 6 वर्षापासून त्या आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com