स्टेट बँक लॉकडाऊन
नंदुरबार

स्टेट बँक लॉकडाऊन

संपर्कातील सहा कर्मचारी क्वारंटाईन

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

खापर - Khapar - Nandurbar - वार्ताहर :

तब्बल तीन आठवड्यानंतर अक्कलकुवा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत कार्यरत असणार्‍या अधिकार्‍याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे बँकेचे व्यवहार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत. संबंधीत अधिकार्‍याच्या संपर्कातील 6 कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील रामपूर व मिर्‍याबारी येथे पाहुणचार घेतलेल्या एकाचा अहवाल गुजरात राज्यात पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रामपूर आणि मिर्‍याबारी येथील संपर्कातील व्यक्तींना खापर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आतापर्यंत अक्कलकुवा तालुक्यात कोरोनाचे 12 रुग्ण आढळले होते. तब्बल 3 आठवड्यानंतर पुन्हा अक्कलकुवा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अक्कलकुवा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत कार्यरत असणारे एक अधिकारी हे नागपूर येथील आहेत. ते नियमितपणे आपल्या शाखेत कार्य करीत होते.काही दिवसांपासून सदर अधिकार्‍याची तब्बेत बिघडत असल्याने अधिकारी हे रजा घेऊन खाजगी वाहनाने नागपूर येथे गेलेत. तेथे त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घेतली. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

नागपूर प्रशासनाने तसे कळविले असून अधिकार्‍याच्या संपर्कातील 6 लोकांना खापर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. 6 लोकांमध्ये 5 कर्मचारी हे बँकेचे आहेत तर 1 महिला ही बाधिताच्या घरात घरकाम काम करणारी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेतील 5 कर्मचार्‍यांना एकाच वेळी क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे बँकेचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. सदर बाधित अधिकारी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे तालुक्यातील रामपूर व मिर्‍याबारी येथे गुजरात राज्यातील उमरान येथील एका कोरोना बाधिताने बहिणीच्या घरी येऊन पाहुणचार घेतला त्यामुळे रामपूर व मिर्‍याबारी येथील बाधिताच्या संपर्कातील 9 लोकांना खापर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुजरात राज्यातील उमराण येथील एकाल तरुणाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्याने तेथील नागरिकांनी सदर तरुणाला सागबारा येथे शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्या तरुणाने सागबारा येथे जाऊन स्वॅब दिला होता. पण लक्षणे दिसून न आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्या तरुणाला घरी पाठविले. त्यानंतर मात्र या तरुणाने तालुक्यातील मिर्‍याबारी येथे बहिणीकडे येऊन चांगलाच पाहुणचार घेतला.

येथे असतांना सागबारा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सदर तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे दूरध्वनीद्वारे सांगितले व बाधीत तरुणाला सागबारा येथे बोलावून घेऊन उपचारार्थ राजपिपला येथे पाठविले आहे. मिर्‍याबारी येथे आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याची माहिती सागबारा प्रशासनाने अक्कलकुवा प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार बाधित तरुणाने भेट दिलेल्या रामपूर व मिर्‍याबारी या गावात निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली आहे. आज मितीला खापर येथे 21 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मालखेडे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com