नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याने महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगरपालिका यांचे एकत्रित पथक तयार करून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी भेट द्यावी आणि ५० पेक्षा अधिक नागरिक दिसून आल्यास कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, विवाह सोहळ्यात अधिक संख्येने नागरिक आढळल्यास कारवाई करून मंगल कार्यालय बंद करण्यात यावे. मंगल कार्यालयाबाहेर कोरोना विषयक सुचनांचा फलक लावण्यास सांगावे. कोरोना बाधित व्यक्तींचे शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात अलगीकरण होईल याची खात्री करावी. कोरोना बाधित आढळत असलेल्या भागात शिबीर आयोजित करून स्वॅब संकलन करावे.

दुकान आणि बाजारात मास्क न घालणार्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशाच स्वरुपाची कारवाई करण्यासाठी बस आणि रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी बैठेपथक नियुक्त करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

श्री.पंडीत म्हणाले, मंगल कार्यालय चालकांची बैठक घेण्यात आली असून त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंगल कार्यालयात नियमांचे पालन न झाल्यास ते सील करण्यात यावे. व्यावसायिकांनी देखील नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर देखील पोलीसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.

श्री.गावडे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी विभागातील इतर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागात अधिक तपासणी करण्यावर भर देण्यात येईल.

बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊन नाही, मात्र नियमांचे पालन करा

जिल्ह्यात लॉकडाऊन बाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या अर्थचक्रावर परिणाम होत असल्याने शासनाकडून निर्देश येईपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. तथापि नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनी स्वत: नियमांचे पालन करण्यासोबत ग्राहकांनादेखील याबाबत सूचना द्याव्यात. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे.

जिल्ह्यात विवाह सोहळे, सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमात शासनाने दिलेल्या मर्यादेच्या आतच उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. विशेषत: कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या जिल्ह्यातून विवाहासाठी पाहुणे मंडळी येत असल्यास खबरदारी घ्यावी.

सोहळ्याचा आनंद घेताना मास्कचा वापर होईल याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे. नियमांचे पालन न केल्यास आयोजक आणि लॉन्स किंवा मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात कारवाई करण्यात येईल.

प्रशासनाने गृह विलगीकरण बंद केल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. तरीदेखील राज्यातील इतर काही जिल्ह्यात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने दक्षता घेण्याची आश्यकता आहे.

नागरिकांनी सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर राखणे आणि मास्कचा वापराविषयी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकार्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.