गहाळ झालेले सात लाखांचे मोबाईल तक्रारदारांना मिळाले परत

गहाळ झालेले सात लाखांचे मोबाईल तक्रारदारांना मिळाले परत

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

गहाळ झालेले, हरविलेले ७ लाख २ रुपये किमतीचे ५३ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत (Superintendent of Police Mahendra Pandit) यांच्या हस्ते आज सदर मोबाईल (Mobile) संबंधीतांना सुपूर्द करण्यात आले.

अन्न, वस्त्र आणि निवारा इतकीच मोबाईलसुध्दा आता माणसाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे सर्व सामान्य लोकांचा बराचसा त्रास कमी झालेला आहे . मोबाईलद्वारे बरीचशी कामे नागरीक घरी गसल्या करु शकतात. त्यातच कोरोनामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाइन मोबाईलद्वारे सुरु झाले आहे. मात्र मोबाईल गहाळ झाला किंवा हरविला तर बर्‍याचशा अडचणी निर्माण होवुन मोबाईल वापरकर्त्यांचा हिरमोड होतो.

जिल्ह्यातील गहाळ/हरविलेल्या मोबाईल शोधुन काढण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने विशेष मोहिम राबविली. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना नोंद असलेल्या गहाळ मोबाईलबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी माहिती घेतली असता मोठया प्रमाणावर मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रारदारांना मोबाईल हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जातील आयएमईआय नंबर्स एकत्रीत करुन मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. हरविलेल्या मोबाईलमध्ये सध्या सुरु असलेल्या मोबाईल नंबरधारकांचा नंदुरबार, धुळे, जळगांव जिल्ह्यात व गुजरात, मध्यप्रदेश राज्यात जावून शोध घेतला. त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

हस्तगत करण्यात आलेले ७ लाख २ रुपये किमतीचे ५३ मोबाईल दि.२२ जुलै २०२१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे तक्रारदारांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत. हरविलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व संपूर्ण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलदारांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com