ब्राम्हणपुरी, ता. शहादा | वार्ताहर- NANDURBAR

गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतत असतांना मारुती अल्टो कारने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडक दिल्याने आई-मुलाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची घटना शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील दर्ग्याजवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या तीन वर्षापासून विसरवाडी ते खेतीया रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कोळदा- खेतीया रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट झाले आहे तर विस्तारीकरणामुळे वाहनधारकांसाठी खुपच त्रासदायक झाले आहे.

रायखेड येथील रहिवासी हर्षल दारसदास व परिवार मारूती अल्टो कार (क्र.एम.एच.१४ जी.जी. ७५२३) ने शहादा मलोणीकडून रायखेड येथील रहिवासी हर्षल सुरेश हारदास हे परिवारसह मारूती (क्र.एम.एच.१४ जी.जी.७५२३) ने शहादा मलोणीकडून रायखेडला जात होते.

सुलतानपूर जवळील दर्ग्याजवळ नादुरुस्त अवस्थेत ट्रॉला (क्रमांक एमएच ३९-५२०६) उभा होता. या ट्रॉलाला मारूती अल्टो ८०० ने मागुन जोरदार धडक दिली.

यात कारमधील विद्याबाई हर्षल हारदास (२५) व आरव हर्षल हारदास (३) हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल सुरेश हारदास, सुरेश खंडेराव हारदास, सरोज सुरेश हारदास, मयुर कांतीलाल शिंदे, ज्ञानेश प्रथमेश हारदास हे जखमी झाले.

अपघाताची तीव्रता

अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, अल्टो कारने धडक दिल्याने लोखंडी ट्रॉला रस्त्यावर उभा असतांना सुध्दा रस्त्याच्या किनार्याकडे ढकलला गेला आणि कारचा चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच रायखेड येथील ग्रामस्थ मिळेल या साधनाने घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. म्हसावद पोलीस ठाण्याचे सपोनि किसन पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहचले.

जखमींना ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी सपोनि किसन पवार, पाना शैलेंद्र राजपूत, पोकॉ.घनश्याम सुर्यवंशी, पोकोॅ नामदेव बिर्हाडे, पोकॉ फुलसिंग गावीत, सचिन विसावे, भगवान धात्रक सहकार्य केले.

ट्रॉला चालकाचा हलगर्जीपणा

रस्त्यात उभी असलेल्या ट्रॉलीला रिप्लेक्टर बसवलेले नव्हते. किंवा लाल झेंडा अथवा कापड लावण्यात आलेले नव्हते. ट्रॉलीचालकाच्या हलगर्जीपणामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत म्हसावद पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३०४ (अ) ३३७, ३३८, २८३, १३४ अन्वये ट्रालीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई सोनवणे करीत आहेत.