अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू

संघटनात्मक कामानिमित्त दौर्‍यावर आले असतांना घडली दुर्दैवी घटना
अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा बुडून मृत्यू

धडगाव - NANDURBAR - प्रतिनिधी :

तालुक्यातील बिलगाव येथील धबधब्याजवळ आंघोळीसाठी गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ (वय ३१, रा.कुर्ला, मुंंबई) हे धडगाव तालुक्यात संघटनात्मक कामानिमित्त दौर्‍यावर आले होते. त्यांच्यासोबत विलास रविंद्र ठाकरे, निलेश संजय शिंदे,

प्रितम प्रविण निकम, शुभम महादया स्वामी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही होते. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बिलगाव येथील धबधब्याजवळ अनिकेत हे आंघोळ करुन बाहेर निघत असतांना त्यांचा अचानक पाय घसरला व ते पाण्यात पडले.

त्यांना वाचविण्यासाठी विलास ठाकरे यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, तेदेखील पाण्यात बुडू लागल्याने कसेबसे काठावर आले. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात येवून तात्काळ रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यानल अनिकेत ओव्हाळ हे धबधब्याखाली ओढले गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

याबाबत सिद्धेश्‍वर अशोक लटपटे यांनी दिलेल्या खबरीनुसार धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटना घडताच पोलीस पथक तेथे दाखल झाले. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली होती. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह मुंबईकडे रवाना करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com