धबधब्याजवळ संरक्षण भिंत न बांधल्यास आंदोलनाचा इशारा

बिलगाव ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन
धबधब्याजवळ संरक्षण भिंत न बांधल्यास आंदोलनाचा इशारा

सोमावल ता. तळोदा :-

धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने तेथे संरक्षण भिंत व सूचना फलक तातडीने लावावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धडगाव तालुक्यातील बिलगावजवळ उदय नदीवर मोठा असा धबधबा आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा धबधबा असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. विशेषतः सप्टेंबर, ऑक्टोेंबर महिन्यापर्यंत हा धबधब्याचा प्रवाह कायम असतो. म्हणून पर्यटक व निसर्ग प्रेमी मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. त्यातही नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील तरुण पर्यटक अधिक प्रमाणात हजेरी लावतात.

साहजिकच पर्यटकांच्या प्रतिसादामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून नावारूपालादेखील येत आहे. मात्र, गेल्या तीन चार वर्षांपासून येथील दुर्घटनेत वाढ होत असल्याने जणू हा धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा बनला आहे. कारण तेथे वनविभागाने सूचना व मार्गदर्शक फलक लावला नसल्यामुळे पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे पाय घसरून अथवा पोहणार्‍या पर्यटकांना जीव गमावावा लागला आहे.

विशेषतः तरुण पर्यटक यात बळी गेले आहेत. गेल्या तीन वर्षात तब्बल सहा तरुण या धबधब्यात मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या आठवड्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकार्‍याचा पाय घसरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. या पार्श्वभुमिवर सदर धबधब्याजवळ शासनाने अथवा वनविभागाने संरक्षक भिंतीबरोबरच मार्गदर्शक सूचना फलक लावावा. जेणेकरून पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना तरी थांबतील अशी मागणी गावकर्‍यांनी धडगाव महसूल प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली आहे.

वास्तविक येथे पर्यटन स्थळाच्या अनुषंगाने शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा असताना साधा सूचना फलकही लावण्यास संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. येथील वाढत्या अप्रिय घटना लक्षात घेवून प्रशासनाने निदान सूचना फलक व संरक्षक भिंत तातडीने उभारावी अशी मागणी संघर्ष ग्रुप चुळवडचे राजेंद्र पवार, रयमाला पावरा, सचिन वळवी, रवींद्र पावरा, अपसिंग पावरा, करण पावरा, ब्रिजलाल पावरा, पंकज पावरा, सुकलाल पावरा, अजित पवारा यांनी केली आहे.

ग्रामस्थांची मागणी

रस्ते, वीज अशा प्राथमिक सुविधाही नाही. धडगाव परिसरात अनेक लहान मोठे धबधबे असले तरी बिलगवचा धबधबा अतिशय मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण सातपुड्यात प्रसिध्द आहे. निश्चितच एक सुंदर, रमणीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकते. मात्र याकडे शासनातील अधिकार्‍यांचे साफ दुर्लक्ष आहे. कारण येथे रस्ते, वीजेसारख्या प्राथमिक सुविधा नाहीत. तरीही शौकीन पर्यटक व निसर्गप्रेमी निसर्गाला न्याहाळण्यासाठी येत असतात. निदान अशा प्राथमिक सुविधेसाठी तरी जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com