नंदुरबार | प्रतिनिधी- Nandurbar

धडगाव-मोलगी रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई करत वाहनासह ७ लाख १८ हजाराचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरूध्द मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, यांना धडगाव-मोलगी रस्त्याने अवैध दारुची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती.त्यानुसार त्यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करुन त्यावर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना दिल्याने त्यांनी पोहवा विनोद जाधव, विकास अजगे, राकेश वसावे, पोकॉ राजेंद्र काटके, अविनाश चव्हाण यांचे पथक तयार करुन रवाना केले.

पथकाने दि.२० मार्च पासुन धडगाव -मोलगी रस्त्यावरील भगदरी फाटा येथे वेषांतर करुन सापळा रचना. दि.२१ मार्च रोजी पहाटे २ वाजेचे सुमारास संशयीतरित्या आलेल्या एका महिंद्रा पिकअप गाडी अडवुन तपासणी केली असता गाडीत चालक व इतर १ इसम मिळुन आला.

गाडीमध्ये ८८ हजार २०० रूपये किमंतीचे पॉवर-१०००० सुपर स्ट्रॉन्ग बियरचे ५०० एमएलचे १ हजार १७६ टिन , १ लाख ३० हजार रूपये किंमतीच्या गोवा व्हिस्कीच्या १८० एमएलच्या १ हजार बाटल्या दिसुन आल्या. चालक व त्याचे साथीदारास गाडीतील मद्यसाठा वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांचेकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळुन आल्याने सदर मद्यसाठा हा चोरट्या वाहतुकीने अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाल्याने ५ लाख रूपये किमंतीचे पिकअप वाहन व मद्यसाठा असा एकूण ७ लाख १८ हजार २०० रु. किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन

चालक गुलाबसिंग कुत्र्या पटले रा. खुंटामोडी ता. धडगाव, त्याचा साथीदार वनसिंग कागड्या मोरे, रा. खांडबारा ता. धडगाव तसेच मद्यसाठा वाहतुक करण्यास सांगणारा जहांग्या फौज्या रा. हट्टी ता. धडगाव यांच्याविरुध्द मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मागील ३ दिवसांत जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या चालणार्या जुगारावर ६ छापे टाकुन ८ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारीस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, पोहेकॉ विनोद जाधव, पोना विकास अजगे, राकेश वसावे, पोकॉ राजेंद्र काटके, अविनाश चव्हाण यांनी पथकाने पार पाडली आहे.