50 हजार ग्रामस्थांनी धुतले शास्त्रोक्त पद्धतीने हात

जिल्हयात जागतिक हात धुवा दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग
50 हजार ग्रामस्थांनी धुतले शास्त्रोक्त पद्धतीने हात

नंदुरबार । प्रतिनिधी- Nandurbar

जागतिक हात धुवा दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात विविध ग्रामपंचायती अंतर्गत हात धुण्याच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

जिल्हाभरात सर्व ग्रामपंचायतींअंतर्गत अंदाजित 50 हजार महिला पुरुष व विद्यार्थी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले.

दि.15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) , एन.एस.ई. फाउंडेशन, सी. वाय.डी.ए.व फिनिश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात सर्व ग्रामपंचायती अंतर्गत हात धुवा प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये तेथील सरपंच, ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व स्वच्छाग्रही यांच्या मदतीने ग्रामस्थांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना हात धुणे विषयी प्रतिज्ञा देण्यात आली.

तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात जागतिक हात धुवा दिना निमित्त हात धुणेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. निर्मलाताई राऊत ,कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजीत पाटील ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र)भुपेंद्र बेडसे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व) डॉ. वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे, फिनिश संस्थेच्या आकांक्षा बोरकर, निरंजन गजभिये , मंगेश निकम, सीवायडीए संस्थेचे अमोल शेवाळे व जिल्हा कक्षातील सर्व तज्ञ सल्लागार उपस्थित होते.

यावेळी हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगणारे गाणे वसीम शेख यांनी सादर केले.तर सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देऊन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी उपस्थितांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन कक्ष व फिनिश संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग घेतल्याबद्दल ग्रामपंचायत लहान कडवान ता. नवापूर व ग्रामपंचायत उमज ता. नंदुरबार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच चित्रकला व निबंध स्पर्धेत लहान व मोठा अशा दोन्ही गटात प्रथम , द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच रांगोळी स्पर्धेत प्रेरणा सुनील दळवी, गायत्री फुलसिंग वळवी व प्रतिक्षा वळवी यांनी विशेष सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केले. तर आभार फिनिश संस्थेचे अभिजीत मैंदाड यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com