जि.प. करेक्ट कार्यक्रम लावण्यासाठी महाविकास आघाडीचे गटनेते सज्ज

खडसेंच्या भेटीनंतर गटनेत्यांनी घेतली पालकमंत्र्यांचीही भेट
जि.प. करेक्ट कार्यक्रम लावण्यासाठी महाविकास आघाडीचे गटनेते सज्ज

जळगाव - महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आता जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतरणाच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे. एकनाथराव खडसे नंतर जिल्हा परिषदेतील महाविकास गटनेत्यांनी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. अजिंठा विश्रामगृहावर रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत मंत्री पाटील यांनी गटनेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असून यामुळे आता जिल्हा परिषदेत कुठल्याही क्षणी राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे .

काही दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेतील भाजपचे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीला मिळाल्यानंतर याठिकाणी सत्तांतर होऊन अनेक वर्षांनंतर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. आता महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषदेचा गडही काबीज करण्यासाठी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. आठवडाभरापूर्वी जिल्हा परिषदेतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतली होती. खडसेंनीही राजकीय समीकरणांच्या आधारावर सत्तांतरणाच्या निर्णय घेतला होता. व गटनेत्यांना काही दिवस थांबा अशा सूचनाही केल्या होत्या. खडसें पाठोपाठ सोमवारी रात्री जिल्हा परिषदेतील गटनेत्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री व गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांची उपस्थिती होती. बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गटनेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.दुसरीकडे सोमवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेवर जिल्हा परिषदेत विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला होता. यानंतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लवकरच सत्तांतरण होणार असल्याचे सांगितले होते.

आता काल पालकमंत्री पाटील यांची गटनेत्यांनी भेट घेतल्याने जि.प.त सत्तांतरणाच्या हालचालीला जोरदार वेग येणार असून जिल्हा परिषदेत कुठल्याही क्षणी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com