रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष ; तरुणीची ७ लाखात फसवणूक
जळगाव

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष ; तरुणीची ७ लाखात फसवणूक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून न्यू सम्राट कॉलनीतील एका तरुणीच्या आईकडून एकूण सात लाख रुपये गंडवणार्‍या वडगाव (ता.रावेर) येथील पिता, पुत्रांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत योगिता ऋषिकेश खैरनार (वय ४०, रा.न्यू सम्राट कॉलनी) यांनी फिर्याद दिली.

त्या त्यांची मुलगी वर्षा आणि श्‍वेता यांच्यासह राहतात. त्यांचे नवीन बी.जे.मार्केटमध्ये सेकंड हँड कलर टीव्ही विक्रीचे दुकान आहे. योगिता खैरनार यांची मुलगी वर्षा हिने कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. ती नोकरीच्या शोधात होती. दुसरी मुलगी श्‍वेता हिचा मित्र आकाश मनोहर पाटील (रा.वडगाव, ता.रावेर) याचे खैरनार कुटंबीयांच्या घरी येणे-जाणे होते.

वेगवेगळ्या कारणांनी उकळले पैसेआकाश हा त्याची रेल्वविभागात ओळख असल्याचे आणि त्याचे वडील भुसावळ येथे रेल्वेमध्ये टी.सी.असल्याचे सांगत होता. जून २०१८ मध्ये आकाश यास श्‍वेता हिने सांगितले की, वर्षाला नोकरीची गरज आहे. त्यामुळे आकाशने सांगितले की, वर्षाला रेल्वेत नोकरी लावून देतो.

वडील रेल्वेत टी.सी.असल्याचेही तो सांगत होता. त्याने नोकरीच्या फॉर्मसाठी १० हजार रुपये घेतले. त्यानंतर १५ दिवसांनी ५० हजार रुपये घेतले. वेळोवेळी वेगवेगळे कारण सांगून त्याने पैसे उकळले. त्यापैकी ऑन लाइन बँकींगच्या माध्यमातून दोन लाख रुपये देण्यात आले. लग्नासाठीही मागितले पैसेआकाश याने श्‍वेता हिला लग्नाचे सुद्धा आमीष दाखविले होते. तर त्याने लग्नासाठी सुद्धा पैसे मागितले होते.

परंतु, वर्षा हिला नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे आकाश याला त्या तरुणीच्या आईने परत मागितले. मात्र, जीवाचे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी आकाश देत होता. तसेच आकाश माझा मुलगा नाही. मी त्यास ओळखत नाही. तुम्ही तुमचे काय ते बघा, असे सांगून मनोहर पाटील याने हात वर करुन दिले.

याप्रकरणी तरुणीच्या आईने तिच्या नातेवाईकांना सांगितले. त्यांनी आकाश याच्याशी वेळोवेळी संपर्क साधला. वर्षाला नोकरी लावून दे, किंवा सात लाख रुपये परत दे, असे सांगितले. पण, त्याने नोकरी लावून दिली नाही आणि पैसेही दिले नाही. त्यामुळे त्या पिता, पुत्रांनी फसवणूक केल्याची खात्री खैरनार कुटुंबीयांची झाली. त्यामुळे तरुणीच्या आईने फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघं पिता, पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील व योगेश बारी करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com